भंडारदरा परिसरात अवैधरित्या दारु वाहतूक करणार्या वाहनास पकडले 2 लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; चालकाविरोधात गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राजूर
भंडारदरा परिसरात अवैध दारु वाहतूक करणार्या वाहनासह वाहन चालकास राजूर पोलिसांनी नुकतेच पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहन व दारु असा 2 लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.
राजूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना भंडारदरा परिसरात एका महिंद्रा मॅक्स गाडीतून अवैधरित्या दारुची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती समजली. त्यानुसार पथकाने घाटघर फाटा, शेंडी, भंडारदरा येथे नाकाबंदी केली. त्यावेळी महिंद्रा मॅक्स कंपनीचे वाहन (एमएच.09 एस.9482) हे दिसून येताच त्याची तपासणी केली असता त्यात 14 हजार 640 रुपये किमतींच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 344 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. वाहतूक करणार्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने रमेश रामचंद्र अस्वले (रा.मुरशेत, ता.अकोले) असे नाव सांगून विना परवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी चालक रमेश अस्वले याच्याविरुद्ध गु.र.नं.101/2021 मुं.पो.अॅक्ट 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनासह दारु असा एकूण 2 लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय मुंढे हे करत आहे. सदर कारवाई सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस नाईक विजय मुंढे, पोलीस शिपाई अशोक गाडे, दिलीप डगळे, पांडुरंग पटेकर यांनी केली.