संगमनेरच्या ‘सुसंस्कृत’ वातावरणाला ‘लांछण’ लावण्याचा प्रयत्न! महिला नेत्याचा ‘अक्षम्य’ भाषेत अवमान; हिंसक वळणानंतर दोन्ही बाजूने तक्रारी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याकडून विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित झाल्यापासून ‘हाय-होल्टेज’ बनलेल्या संगमनेर मतदार संघातील ‘सुसंस्कृत’ राजकीय वातावरणाला वयाची मर्यादा ओलांडलेल्या वाचाळवीराने ‘लांच्छण’ लावण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्या ‘युवा संवाद यात्रे’सह भाजपनेते डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या ‘युवा संकल्प यात्रे’तून तिसर्या पिढीतील राजकारणाचे दर्शन घडत आहे. शुक्रवारी मात्र पंधरवड्यापासून रंगलेल्या या शाब्दीक कलगीतुर्यानेे मर्यादा ओलांडली. धांदरफळ येथील डॉ.विखे-पाटील यांच्या संकल्प यात्रेचा मंच वापरुन यापूर्वी अनेकदा अशाच कारणाने जनपडीचा सामना केलेल्या वसंत देशमुख नावाच्या कथीत पुढार्याने डॉ.जयश्री थोरात यांच्यावर अतिशय हीन पातळीवर जावून गलिच्छ भाषेत विधान केले. त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले. चिखलीजवळ विखे समर्थकांची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी घातली गेली तर, बायपास बोगद्याजवळ 25 जणांनी सशस्त्र हल्ला करुन बोलेरो वाहन फोडून टाकले. याप्रकरणी दोन्ही बाजूने एकूण चार तक्रारी दाखल करण्यात आल्या असून चिखळीजवळील जळीत प्रकरणाची तक्रार मात्र अद्यापही दाखल झालेली नाही. या दोन्ही घटनांचे छायाचित्रण उपलब्ध असल्याने थोरात समर्थकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण तापत असताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाला माजीमंत्री थोरात कारणीभूत असल्याचे मानून प्रतिशोध घेण्याच्या इच्छेने डॉ.सुजय विखे-पाटील यांनी संगमनेर मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी ‘तो’ त्यांच्या राजकीय वक्तव्याचा भाग मानला गेला, मात्र ‘संगमनेर’ त्यांनी किती गांभीर्याने घेतले आहे हे त्यांच्या तळेगांव गटातील पहिल्याच सभेतून स्पष्टपणे दिसून आले होते. त्यावेळी सभेसाठी जमलेली गर्दी, सभास्थानी येताना गावागावात कमानी उभारुन झालेले जंगी स्वागत, त्याचे थेट प्रसारण यातून त्यांनी एकप्रकारे माजीमंत्री थोरात यांच्यासमोर दंडच थोपटले.
त्याचवेळी राज्यात मोठी जबाबदारी असल्याने बाळासाहेब थोरात यांची मतदार संघातील उणीव भरुन काढण्यासाठी त्यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी पेमगिरीपासून 145 गावांमधून जाणारी ‘युवा संवाद यात्रा’ सुरु केली. थोरात-विखे घराण्यातील तिसर्या पिढीतील या दोघा युवा नेत्यांनी आपापल्या यात्रांच्या मंचावरुन एकमेकांच्या राजकारणावर मनसोक्त शिंतोडे उडवले. अगदी ‘बापा’ पासून सुरु झालेला विषय ‘टायगर’ आणि ‘वाघिणी’पर्यंत गेला. मात्र तरीही राजकारणाची अलिखित मर्यादा ओलांडली गेली नव्हती, मात्र आता या दोन्ही यात्रा शेवटाला असतानाच धांदरफळमधील डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या युवा संकल्प यात्रेच्या मंचाने संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाला ‘नख’ लावले. यापूर्वीच्या सर्वच सभेत विखे-पाटलांसह अन्य स्थानिक वक्त्त्यांनीही एकमेकांवर मनसोक्त तोंडसुख घेतले, मात्र तो राजकारणाचाच भाग.
परंतु, धांदरफळमध्ये घडलेला प्रकार समस्त महिला जातीलाच शरमेने मान खाली घालायला लावणारा होता. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यापासून त्यांचा राजकीय द्वेष करणार्या स्थानिक वसंत देशमुख नावाच्या कथीत नेत्याला या मंचाच्या अध्यस्थस्थानी बसवण्यात आले होते. त्याने मिळालेल्या संधीचा आपल्या मनातील द्वेष ओकण्यासाठी वापर केला. सुरुवातीला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर थोरात कन्या डॉ.जयश्री यांच्या युवा संवाद यात्रेचा धागा पकडून त्याने राजकारणाच्या अतिशय हीन पातळीवर जावून टिपणी केली. त्यांच्या या घाणेरड्या वक्तव्यानंतर मंचावरील लोकांना त्यांच्या परिणामांची जाणीव झाल्याने त्यांनी देशमुखला भाषण उरकते घेण्याची सूचना देण्यात आली. मात्र तो पर्यंत त्याने आपल्या मनातील मळमळ बाहेर टाकली होती.
दोन्ही बाजूच्या यात्रांचे युट्यूबवरुन थेट प्रसारण सुरु असल्याने धांदरफळमधील हा प्रकार संगमनेरसह आसपासच्या अनेकांनी पाहिला आणि ऐकला. त्यातून थोरात समर्थक कार्यकर्त्यांचा राग अनावर होवून धांदरफळच्या महिला सरपंच उज्ज्वला देशमाने यांनी गावातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांसह सभा संपल्यानंतर मोकळ्या झालेल्या मंचाचा ताबा घेत परतणार्यांना उद्देशून जाहीर माफीची मागणी करण्यात आली. चिखलीजवळ संतप्त कार्यकर्त्यांनी सभेवरुन परतणार्या एका वाहनाला आडवून त्याच्यावर हल्ला केला व वाहनाची तोडफोड करुन पेट्रोल टाकीत ते पेटवून दिले. तसाच मात्र काहीसा वेगळा प्रकार मालपाणी इस्टेटजवळील बायपासच्या बोगद्याजवळ घडला.
आधीच बोगद्याखाली जमा झालेल्या 20 ते 25 जणांनी धांदरफळकडून येणारे बोलेरो (क्र.एम.एच.14/डी.एन.4580) वाहन अडवले. या वाहनात अमोल बाळासाहेब दिघे, साहेबराव दिघे, भानुदास चत्तर, चव्हाणके, नीलेश दिघे व उत्तम दिघे (सर्व रा.तळेगाव) हे कार्यकर्ते होते. अचानक वाहन थांबवून समोर आलेल्या जमावाने वाहनाची तोडफोड करण्यासह प्रवाशांनाही मारहाण करायला सुरुवात केल्याने वाहनात बसलेले सर्वजण भयाने अंधारात आसपास जावून लपले. यातील काहींनी या संपूर्ण घटनेचे छायाचित्रणही केले आहे. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांचे वाहन दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही बोलले जाते. धांदरफळमधील वाचाळवीराच्या घाणेरड्या शब्दाने उठलेला आगडोंब चिखली, संगमनेर नंतर थेट निमोणमध्ये जावून पोहोचला.
संदीप भास्कर देशमुख यांनी चांगदेव मारुती घुगे, जालींदर रमेश मंडलिक, विकास रामनाथ आंधळे, आदेश विजय शेळके, वसीम झारुद्दीन मनियार (सर्व रा.निमोण) गावातील शहनाज शफिक तांबोळी यांच्या घरासमोर जावून आधी जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांचा गळा आवळला. नंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे गंठण, कपाटातील दागिने, रोख 14 हजार 500 असा ऐवज घेवून ते सगहे निघून गेले. अशा अशयाचीही एक फिर्याद झाली. तर, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्या वाहनाचा चालक वाहनासह (क्र.एम.एच.17/सी.आर.1541) निमोणहून कर्ह्याच्या दिशेने येत असताना पाच ते सात अनोळखी इसमांनी त्याला आडवून ‘तु इकडं कशाला चकरा मारतोय?’ असा सवाल करीत करीत ‘जशी निमोणला मारहाण केली तशी करु’ अशी धमकी देत त्यांच्या ताब्यातील वाहनाच्या दर्शनी भागासह डाव्या बाजूच्या दोन्ही काचा फोडल्या. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
धांदरफळमध्ये वादग्रस्त, आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या वसंत देशमुख विरोधात तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद होत तक्रार दिली आहे. त्यावरुन तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 192, 79 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, धांरफळच्या सरपंच उज्ज्वला देशमाने यांच्या फिर्यादीवरुन कमलेश दिलीप डेरे, गोकूळ भास्कर देशमुख, अमोल धोंडीबा खताळ, हरीश सर्जेराव वलवे, प्रशांत आबासाहेब कोल्हे व इतर 50 ते 60 जणांविरोधात भारतीय न्यासंहितेच्या कलम 74, 356 (2), 189 (2), 115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानवडे यांचा चालक युवराज गाडेकर (रा.मालदाड रोड) याच्या फिर्यादीवरुन अज्ञात 5 ते 7 जणांवर न्यासंहितेच्या कलम 126 (2), 324 (4), 189 (2), 191 (2), 351 (2) प्रमाणे तालुका पोलिसांनी स्वतंत्र चार गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर, शहर पोलीस ठाण्यात अकोले रस्त्यावरील बोगद्याजवळ घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेत अमोल घोगरे (रा.कोल्हार) याच्या तक्रारीवरुन अज्ञात 20 ते 25 जणांविरोधात न्यायसंहितेच्या कलम 189 (2), 191 (2), 190, 324 (4), 115, 126 (2) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखलीत घडलेल्या वाहन जळीत प्रकरणाची तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. या घटनेत हल्ला करणारे तरुण ज्या वाहनातून आले होते ते स्थानिकांनी थांबवून ठेवल्याने पोलिसांचा तपास सोपा झाला आहे.
यासर्व घटनाक्रमावरुन एकमेकांच्या विरोधात राजकीय आसूड ओढता ओढता विखे-थोरात घराण्याच्या तिसर्या पिढीतील राजकीय वारसांनी आपल्या राजकारणाची दिशाही ठरवल्याचे दिसत असून अत्यंत हीन आणि निषेधार्ह असलेल्या मात्र कायद्याच्या कक्षेत असतांनाही थेट आजवरच्या संस्कृती आणि मर्यादेला छेद देत थेट हल्ला करण्यापर्यंत पोहोचलेल्या पातळीने संगमनेरातील राजकारण बदलत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यापुढील काळात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी कोणत्या पातळीवर जावून घडतील हे येणारा काळच सांगेल. तुर्ततः संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाने आता मर्यादा ओलांडली आहे हे सत्य.
विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष राज्याला नवा नाही. गेली अनेक दशकं अतिशय सुप्तपणे सुरु असलेल्या या लुटुपुटुच्या राजकीय लढाईला त्यांच्या तिसर्या पिढीने मात्र कलाटणी दिली आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना राज्यात अत्यंत संयमी नेते म्हणून ओळखले जाते. त्यांचा संयम मात्र त्यांच्या नंतरच्या पिढीतील नेतृत्त्वातून लोप पावल्याचे या घटनेतून दिसून आले. अत्यंत संतापजनक वक्तव्यानंतर दुखावलेल्या डॉ.जयश्री थोरात, दुर्गा तांबे, मैथीली तांबे यांच्यासह संपूर्ण रात्र गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर शेकडों कार्यकर्त्यांसह तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात बसून होते. सकाळी साडेसात वाजता शेवटची फिर्याद दाखल झाली.