संभ्रमासाठी भाजप प्रवेशाच्या वावड्या : थोरात तथ्य नसल्याचा उच्चार; भाजपच्या शेतकरी धोरणावरही टीका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून काहीजणांकडून आपल्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या पसरवल्या जात आहेत. त्यातून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असून आपण कोणत्याही भाजप नेत्याची भेट घेतली नाही. पक्षांतराच्या चर्चा खोट्या असून काँग्रेस पक्षाबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. कांद्याच्या निर्यात धोरणाबाबत भाजपची धरसोड भूमिका असून सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याची टीका माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. बुधवारी (ता.21) कोल्हापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.


काँगे्रसचे ज्येष्ठनेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे अन्य नेतेही लवकरच पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच नगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी माजीमंत्री थोरात यांच्या वाढदिवस शुभेच्छा फलकांवरुन काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांची छायाचित्रे ‘गायब’ झाल्याकडे उंगलीनिर्देश करीत या चर्चांना हवाही दिली. तोच धागा पकडून त्यांचे वडील व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही थोरातांच्या भाजप प्रवेशाबाबत टीपणी केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.


त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये असलेल्या थोरात यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्षांतराच्या केवळ ‘वावड्या’ असल्याचे सांगत सध्या सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचे सांगत आपण कोणत्याही भाजप नेत्याची भेट घेतली नसल्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले, केवळ अपप्रचार करण्यासाठी आपल्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात असून ते खोटे आहे. काँग्रेसच्या विरोधात हा अपप्रचाराचा भाग असून जनतेला या गोष्टी चांगल्या ठाऊक असल्याचेही ते म्हणाले.


केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारवर टीका करताना माजीमंत्री थोरात यांनी कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर बोटं ठेवले. जेव्हा गरज होती, तेव्हा सरकारने काहीच केले नाही. आणि गरज नसतांना निर्यात बंदी उठवण्यात आली. यावरुन भाजपचे प्रत्येक धोरण शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. या सर्वांचा परिणाम शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होण्यात झाला असून त्याचे दृष्य चित्र दिल्लीत दिसत असले तरीही देशभरातील शेतकर्‍यांची अवस्था एकसारखीच असल्याचेही थोरात यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांपासून माजीमंत्री थोरात यांच्यासह काँग्रेसमधील अनेकजण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही भाजपात दाखल झाल्याने या चर्चांना बळ मिळत होते. नगरचे खासदार आणि त्या पाठोपाठ राज्याच्या महसूलमंत्र्यांनीही याच ‘वावड्यां’ना हवा दिल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच थोरातांकडूनही याबाबत कोणतीच स्पष्टता येत नसल्याने त्यात आणखी भर पडली होती. मात्र आता त्यांनी याविषयी भाष्य केले असून पंधरवड्यापासून सुरु असलेल्या ‘पक्षांतरा’च्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *