भंडारदर्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान! घाटघर मध्ये पाच इंच पाऊस; दोनशे दशलक्ष घनफूट पाण्याची धरणात आवक

नायक वृत्तसेवा, अकोले
गत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धरण क्षेत्रातील डोंगरदर्यांना साज चढलेला असताना आता मान्सूनच्या जोरदार आगमनाने भंडारदरा पाणलोट क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांपासून जोर चढलेल्या पावसाने भंडारदर्याच्या पाणलोट क्षेत्राला अक्षरशः झोडपून काढले. एकट्या घाटघरमध्ये तब्बल १२२ मिलिमीटर (पाच इंच) पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने धरणात मान्सूनच्या नवीन पाण्याची आवकही सुरु झाली असून आज सकाळी सहा वाजेपर्यंत धरणात २१८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

यंदाच्या वर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वीच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुळा खोऱ्यातील अंबित लघुपाटबंधारे प्रकल्पासह कोल्हापूर पद्धतीचे काही बंधारेही ओसंडले. त्यानंतर आता मुळाधरणासह भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासात घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, भंडारदरा, साम्रद अशा सर्वदूर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्याचा परिणाम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन असंख्य जलप्रपात कोसळू लागले असून ओढ्या-नाल्यांनाही आवेश चढला आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवकही सुरु झाली आहे.गेल्या २४ तासात भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे हंगामात पहिल्यांदाच विक्रमी १२२ मिलिमीटर (पाच इंच) पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल रतनवाडीत १०७ मिलिमीटर, पांजरे येथे ७८ मिलीमीटर, भंडारदर्यात ६० मिलिमीटर, निळवंडे येथे २५ मिलीमीटर, आढळा धरणक्षेत्रात तीन मिलिमीटर, कोतुळमध्ये चार मिलीमीटर, अकोल्यात सात मिलिमीटर व संगमनेरमध्ये अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासात मुळा धरणाचा पाणीसाठा ९ हजार ३०६ दशलक्ष घनफूट (३५.७९ टक्के),भंडारदरा २ हजार ६२७ दशलक्ष घनफूट (२३.८० टक्के), निळवंडे २ हजार ५८६ दशलक्ष घनफूट (३१.०८टक्के), ५६८ दशलक्ष घनफूट (५३.१९ टक्के) व भोजापूर धरणात ३५ दशलक्ष घनफूट (९.७० टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. गेल्या २४ तासात भंडारदरा धरणात सर्वाधिक २१८ दशलक्ष घनफूट तर, मुळा आणि भोजापूर धरणात अनुक्रमे १५ आणि १४ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी अवकाळी पावसामुळे भंडारदर्याच्या काजवा महोत्सवावर परिणाम झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र त्यानंतर अल्पावधीतच मान्सून सक्रिय झाल्याने आणि अवकाळी पावसामुळे परिसरातील निसर्ग बहरल्याने पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा सर्वोत्कृष्ट पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोटात पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून भंडारदर्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visits: 174 Today: 1 Total: 1416149
