किशोर कालडा यांची देशव्यापी संस्थेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड! मराठी नवोदित कलाकारांना मिळणार मोठी मदत; निवडीबद्दल होतोय अभिनंदनाचा वर्षाव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चंदेरी दुनियेत प्रवेश करु इच्छिणार्‍या नवकलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेल्या फेडरेशन ऑफ एन इनक्रेडिबल टीव्ही अ‍ॅण्ड मुव्ही आर्टिस्ट्स या देशव्यापी संस्थेच्या राज्य जनरल सेक्रेटरीपदी संगमनेरचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर कालडा यांची निवड झाली आहे. देशभरातील 18 भाषांमध्ये काम करणार्‍या या संस्थेचा मुख्य हेतू नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा आहे. हैद्राबादेत मुख्यालय असलेल्या या देशव्यापी संस्थेच संस्थापक सी.एन.कुमार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळात प्रयत्न करणार असल्याचे कालडा यांनी यावेळी सांगितले.

देशभरातील अनेक उद्योगपती, समाजसेवक, गायक, छोट्या पडद्यावरील कलाकार, गायक चित्रपट कलावंत, पत्रकार व चित्रकार अशा सर्व घटकांसाठी काम करणार्‍या या संस्थेच्या माध्यमातून मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, इंग्रजी, पंजाबी, व तेलुगू या भाषेतील कलाकारांना अधिक प्राधान्य दिले आहे. चंदेरी दुनियेबाबत अनेकांच्या मनात मोठे आकर्षण असते तर अनेक कलाकारांमध्ये प्रतिभा असूनही तेथपर्यंत पोहोचण्याचा दुवा नसल्याने त्यांची अडचण होते. अशा कलाकारांना पुढे आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न संस्थेच्यामार्फत केला जातो.

नवोदित कलाकारांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेवून त्याद्वारा त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही संस्थेकडून राबविला जातो. पुढील काळात चंदेरी दुनियेतील नवोदित कलाकारांसाठी राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही दिला जाणार आहे. याशिवाय सिनेसृष्टीतील दिग्गज चेहरा असलेले अमिताभ बच्चन व सलमान खान यांच्यासारख्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. संस्थेचे संस्थापक असलेल्या सी.एन.कुमार यांना आठ भाषा अवगत असून आत्तापर्यंत त्यांनी नवोदितांसाठी मोठे काम केले आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात त्यांची किशोर कालडा यांच्याशी ओळख झाली, आणि त्यातूनच त्यांना राज्याची जबाबदारी देण्यात आली.

संगमनेरचे किशोर कालडा म्हणजे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व आहे. अगदी लहानवयापासून व्यायाम आणि खेळ यांच्याशी संलग्न असलेल्या कालडा यांनी तारुण्यावस्थेत पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश करुन क्रीडा आणि कला या क्षेत्रात लिखाणाचे नैपुण्य प्राप्त केले. याशिवाय त्यांना बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्येही मोठा रस असून या क्षेत्रासाठी देशपातळीवर त्यांनी काम केले आहे. देशभरातील अनेक बॉडी बिल्डर्स व पहेलवानांशी त्यांचे चांगले संबंधही निर्माण झाले आहेत. आता त्यांची नियुक्ती कलाकारांच्या दुनियेत काम करणार्‍या देशव्यापी संस्थेच्या जनरल सेक्रेटरीपदी झाल्याने त्यांच्या माध्यमातून मराठी नवोदित कलाकारांना मोठी मदत मिळेल. त्यांच्या नियुक्तीबद्दल संगमनेरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 1980762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *