मालदाडच्या ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे! सरपंचाचा मनमानी गैरकारभार; शाळा खोल्यांनाही ना-हरकत प्रमाणपत्र देईना


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामपंचायतीचे सरपंचपद म्हणजे गावच्या मालकीचा परवानाच अशा अविर्भावात वावरणार्‍या आणि मनाला वाटेल तसे कामकाज करणार्‍या तालुक्यातील मालदाड येथील सरपंचाविरोधात ग्रामस्थांचा रोष आज उफाळून आला. येथील सरपंचाच्या मनमानी आणि गैरकारभाराला वैतागलेल्या येथील ग्रामस्थांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली, कारवाई न झाल्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र या कालावधीत सरपंचाविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या मालदाडकर महिलांनी आज जमावाने जात ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

याबाबत गेल्या 3 जानेवारी रोजी मालदाडमधील जवळपास 457 ग्रामस्थांनी संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना सरपंचाविरोधात निवेदन सोपविले होते. त्यानुसार मालदाड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचा मनमानी कारभार सुरु असल्याचे सांगतांना त्यांच्या तक्रारींचा पाढाचा मांडण्यात आला होता. मनात येईल तशी कामे करणे, प्रत्येक कामात भ्रष्टाचार करणे, सभेचे इतिवृत्त परस्पर बदलणे, ग्रामसभेच्या ठरावानुसार कामकाज न करणे, वित्त आयोगातील निधी परस्पर मनमानी पद्धतीने खर्च करणे, कोणतेही पत्र न देताच ग्रामस्थांवर करवसुलीची कारवाई करणे, खोटे पंचनामे तयार करणे, गावातील पथदिवे, स्वच्छता व आरोग्य इत्यादी कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे, शिवार रस्त्यांचे डांबरीकरण अशा विविध कामांसाठी आलेला निधी खर्च न करता कामे प्रलंबित ठेवणे. शासनाकडून मुरमीकरणासाठी आलेल्या निधीतून शिवार रस्त्यांवर मुरम न टाकताच काही सदस्यांच्या मदतीने परस्पर पैसे काढून अपहार करणे यासारख्या अनेक प्रश्नांचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला होता. शिवाय याच मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये याच आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न होता उलट सरपंचाचा गैर व मनमानी कारभार अधिक वाढल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले होते.

मालदाडमधील सेवा संस्कार संस्थेने 22 डिसेंबर 2021 रोजी आपल्या मालकीच्या तीन सर्व्हे नंबरमधील क्षेत्र बिनशेती करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला होता. त्यावर देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही या निवेदनातून गटविकास अधिकार्‍यांचे लख्य वेधण्यात आले होते. दिनांक 25 व दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी झाालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी सेवा संस्कार संस्थेच्या शासनमान्य व अनुदानीत असलेल्या श्रमशक्ति माध्यमीक विद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी मागण्यात आलेल्या बिनशेती ना-हरकत प्रमाणपत्राला या दोन्ही ग्रामसभेत ठराव करुन मंजूरी देण्यात आली होती.

या ग्रासभेत तंटामुक्तीचे अध्यक्ष, कामगार पोलीस पाटील, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संस्था व पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यासाठी अनेकदा ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करुन व ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्याला मंजूरी देवूनही सरपंच मुद्दाम ना-हरकत प्रमाणपत्र देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून या विद्यालयाच्या इमारतीचे काम खोळंबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाबही या निवेदनातून लक्षात आणून देण्यात आली होती. विशेष म्हणजे या शिक्षण संस्थेने इमारतीसाठी जागाही खरेदी केली असून केवळ बिनशेती करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळत नसल्याने बांधकाम होत नाही.

गावाच्या विकासाची शपथ घेवून पदावर बसलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे गावालाच अडचणीत आणण्याचा हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगत येत्या आठ दिवसांत त्यावर कारवाई न झाल्यास गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी मालदाड ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता सतंप्त झालेल्या ग्रामस्थांनी मोर्चाने कार्यालयात जावून महिलांच्या हस्ते ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे. आता ग्रामस्थांच्या या भूमिकेवर गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष्य लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *