कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयावरुन काळे-कोल्हेंमध्ये श्रेयवादाची लढाई दोघांनीही आपल्याच पाठपुराव्यामुळे श्रेणीवर्धनास मंजुरी मिळाल्याचा केला दावा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मध्यवस्तीत सहा एकर क्षेत्रात विस्तारलेल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयातरुपांतरीत करण्यासाठी मान्यता मिळाली. दरम्यान भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विद्यमान आमदार आशुतोष काळे या दोघांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे श्रेणीवर्धनास मंजुरी मिळाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे श्रेयवादावरून दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, तीस खाटांचे अद्ययावत इमारतीसह रुग्णालय, कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. सन 2015 पासून या कामाचा पाठपुरावा सुरू होता. सन 2018 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले होते. सन 2011 च्या जनगणनेवर आधारीत आरोग्य संस्थांचा जोडबृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषांनुसार जोडबृहत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा संचलनालय मुंबई यांनी प्रस्तावास मान्यता दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी देखील आपल्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी पत्रकात म्हंटले कि, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यादृष्टीने प्रयत्न होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांनी खूप दु:ख सोसले त्यादृष्टीने प्रयत्न करताना 100 बेडचेच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असा आग्रह लावून धरला होता.

पाठपुराव्याची योग्य दखल व केलेल्या आग्रहातून 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. केवळ दीडच वर्षात जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता होत असल्याचे आत्मिक समाधान मिळत आहे. उर्वरित वचनांची पूर्तता करण्यासाठी यापुढेही बांधील असल्याचे आमदार काळे पुढे म्हणाले. नागरिकांना मात्र एकाच छताखाली आयसीयूसारखी चांगली दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Visits: 114 Today: 2 Total: 1112462

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *