पाणलोटातील पावसाचा जोर ओसरला; संततधार मात्र कायम! भंडारदर्याचा पन्नास तर मुळा धरणाचा पाणीसाठा झाला चाळीस टक्के..
नायक वृत्तसेवा, अकोले
शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पुनरागम करणार्या मान्सूनचा जोर तीन दिवसांनंतर काहीसा ओसरला आहे. मात्र संततधार कायम असल्याने धरणात सुरु असलेली पाण्याची आवक सुरुच असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठा चाळीस टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. मंगळवारच्या पावसाने भंडारदर्यात सर्वाधिक 411 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले असून पाणीसाठा पन्नास टक्के झाला आहे. सध्या विद्युत निर्मितीसाठी धरणातून 837 क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे. मुळा खोर्यातील कोतुळनजीक मुळा नदीचा वेग आजही कायम असून आज सकाळी नदीपात्रातून 5 हजार 826 क्युसेक्सचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेने झेपावत आहे. मंगळवारी पाणलोटासह लाभक्षेत्रातही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
वेळेवर दाखल होवूनही दीर्घकाळ ओढ देणार्या वरुणराजाचे शनिवारी (ता.17) धरणांच्या पाणलोटात पुनरागमन झाले. स्वाती नक्षत्राच्या पूर्वार्धातच भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील अमृतवाहिनी प्रवरेच्या उगमस्थानी रतनगडावर जोरदार जलधारा कोसळल्या. त्यामुळे गडावरुन धरणाच्या दिशेने झेपावणार्या प्रवरेने उग्ररुप धारण केले आहे. रतनगडावर जाण्यासाठी प्रवरेचे पात्र ओलांडून जावे लागते मात्र सध्या प्रवरानदी दुथडी भरुन वाहत असल्याने रतनवाडीतून गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पाणलोटातील घाटघर, पांजरे, उडदावणे या परिसरातही गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम कायम असून जोर ओसरुनही संततधार सुरु असल्याने परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे. अनेक छोटे-मोठे ओहोळ धुक्यात हरवलेल्या सह्याद्रीच्या माथ्यावरुन धरणीच्या दिशेने निघाल्याचे दृष्य स्वर्गीय आनंद देणारे असल्याने असंख्य पर्यटकांचे पाय पाणलोट क्षेत्राकडे वळू लागले असून येथील हॉटेल व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत होत आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदर्यात या हंगामातील उच्चांकी 411 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे.
प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंतीच्या खोर्यात अद्यापही पावसाला फारसा जोर नाही. मात्र कळसूबाईच्या शिखरांवर अधुनमधून आषाढसरी कोसळत असल्याने कृष्णवंतीचा प्रवाह वाहता आहे. सद्यस्थितीत कृष्णवंतीवरील वाकी जलाशयात 87.36 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. हा जलाशय तुडूंब झाल्यानंतरच निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढते. सध्या सुरु असलेली संततधार पुढील दोन-तीन दिवस कायम राहिल्यास हा जलाशय ओसंडण्याची शक्यता आहे. तूर्त भंडारदरा धरणातून विद्युत निर्मितीसाठी सोडले जात असलेले पाणी निळवंडे धरणात दाखल होत असून जलाशयातील पाणीसाठा हलता आहे. मागील चोवीस तासांत निळवंडे धरणात 100 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे.
मुळा खोर्यातील सर्वाधिक पावसाचे आगार असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या परिसरात मात्र पावसाचा जोर टिकून असून कोतुळनजीकच्या मुळापात्रात त्याचे प्रतिबिंब बघायला मिळत आहे. या परिसरातील पावसाची आकडेवारी मिळण्यात अनेक अडचणी असतात, त्यामुळे कोतुळचा पाऊस आणि येथील नदीपात्रातील पाण्यावरुनच मुळा खोर्यातील पावसाचा अंदाज बांधला जातो. सद्यस्थितीत गेल्या तीन दिवसांपासून मुळानदीने हंगामातील कमाल पातळी गाठली असून आज सकाळी सहा वाजताही कोतूळ नजीक मुळापात्रातील पाण्याचा प्रवाह 5 हजार 826 क्यूसेक्स मोजला गेला आहे. त्यामुळे खोर्यात सर्वदूर मान्सूनचा जोर टिकून असल्याचे स्पष्ट आहे.
या नदीवरील आंबित पाठोपाठ कोतुळनजीकचे पिंपळगाव खांड पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेला 182 दशलक्ष घनफूट क्षमतेचा कोथळे लघुपाटबंधारे प्रकल्पही तुडूंब भरला आहे. त्यामुळे मुळा नदीच्या प्रवाहात आता आणखी भर पडली असून मुळानदीत दाखल होणारे संपूर्ण पाणी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 248 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले असून धरणाचा एकूण पाणीसाठा 40.20 टक्के झाला आहे. उशीराने का होईना मात्र धरणांच्या पाणलोटात मान्सूनने पुनरागम केल्याने आदिवासी बांधवांसह लाभक्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस व धरणांतील पाणीसाठे : रतनवाडी 155 मिलीमीटर, घाटघर 122 मिलीमीटर, पांजरे 122 मिलीमीटर, भंडारदरा 117 मिलीमीटर, वाकी 95 मिलीमीटर, निळवंडे 11 मिलीमीटर, आढळा तीन मिलीमीटर, कोतुळ पाच मिलीमीटर, अकोले पाच मिलीमीटर, संगमनेर पाच मिलीमीटर, ओझर दोन मिलीमीटर, आश्वी मिलीमीटर, लोणी 15 मिलीमीटर व श्रीरामपूर तीन मिलीमीटर. पाणीसाठे – मुळा 10 हजार 451 दशलक्ष घनफूट (40.20 टक्के), भंडारदरा 5 हजार 459 दशलक्ष घनफूट (49.45 टक्के), निळवंडे 1 हजार 600 दशलक्ष घनफूट (19.23 टक्के), आढळा 479 दशलक्ष घनफूट (45.19 टक्के) आणि भोजापूर 50 दशलक्ष घनफूट (13.85 टक्के).