‘भारत बंद’ विरोधातच शेतकर्यांनी रस्त्यावर उतरावे ः विखे विरोधकांचा केवळ राजकीय फार्स असल्याची केली घणाघाती टीका
नायक वृत्तसेवा, राहाता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने लागू केलेल्या कृषी विधेयकाला राजकीय हेतूने होत असलेला विरोध म्हणजे शेतकर्यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांचा ‘भारत बंद’ केवळ राजकीय फार्स असून, केंद्र सरकारला पाठिंबा देत बंद विरोधात शेतकर्यांनीच आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.
दिल्लीत सध्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार ता.8) विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, काही पक्षांच्यावतीने आयोजित केलेला बंद केवळ राजकीय हेतूने प्रेरीत आहे. ज्यांनी मॉडेल अॅक्ट देशात आणला तेच आता या कृषी विधेयकाला विरोध करीत असल्याचे आश्चर्य वाटते. राज्यात आम्ही सतेत असताना आम्हालाही या मॉडेल अॅक्टचे समर्थन करण्यास सांगण्यात आले. कृषी क्षेत्रातील या तरतुदीच आता कायद्याच्या माध्यमातून लागू करण्यात आल्यानंतर त्याला आता विरोध का, असा सवाल त्यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे देशातील शेतकर्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे आहेत. परंतु या कायद्याला विरोध म्हणजे शेतकर्यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. नव्या कृषी धोरणामुळे देशातील शेतकरी आत्मनिर्भरतेने पुढे जाईल. भारत बंदला शेतकर्यांनीच विरोध करून केंद्र सरकारच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिर्डीत बाहेरच्यांची लुडबूड नको!
शिर्डी संस्थानने दर्शनासाठी येणार्या भाविकांना भारतीय पोषाखात येण्याबाबत केलेल्या आवाहनावर भाष्य करताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, याबाबत संस्थानने अधिक भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. बाहेरच्या लोकांनी येवून शिर्डीत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. शिर्डी संस्थान आणि ग्रामस्थ याबाबत जो निर्णय घेतील त्यासोबत आपण राहणार आहोत.