… अन् कृषीमंत्र्यांनी वाहन थांबवून खरेदी केल्या भुईमूगाच्या शेंगा! सोनई बसस्थानकातील विक्रेत्या शेतकर्याशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा
नायक वृत्तसेवा, नेवासा
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रम आटोपून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी जाताना सोनई बसस्थानक येथे आपली मोटार व सर्व लवाजमा थांबवून कृषीमंत्री दादा भुसे यांनी भुईमूगाच्या शेंगा खरेदी केल्या.
येथील बसस्थानक ते राहुरी रस्त्याच्या कडेला सोमवारी (ता.28) दुपारी अडीच वाजता मंत्री भुसे यांची मोटार अचानक थांबली. बरोबरच्या इतर दहा ते पंधरा मोटारी थांबल्या. काय झालं म्हणून सर्वच गोंधळात होते. बघ्यांचीही गर्दी झाली होती. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून शेतकरी भुईमूगाच्या शेंगा विक्री करीत होता. ते पाहताच कृषीमंत्री भुसे थबकले. शेतकरी आदिनाथ नवनाथ दहिफळे यांच्याशी संवाद साधत विक्री व उत्पन्नाविषयी जाणून घेतले.
वंजारवाडी शिवारात जमीन असलेल्या दहिफळे यांना मंत्री भुसे यांनी असली हातविक्री परवडते का? अन्य कुठले पीक घेता, शेतात ठिबक सिंचन व शेततळे आहे का असे प्रश्न विचारले. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना चांगली आहे. असे म्हणून त्यांनी शेतकरी दहिफळे यांना शुभेच्छा दिल्या. घेतलेल्या दोन किलो ओल्या शेंगाचे पैसे देवूनच ते पुढील कार्यक्रमास गेले.
जलसंधारण मंत्री गडाख यांच्या वस्तीवर शिवसेना पदाधिकार्यांची बैठक झाली. येथे मंत्री गडाख यांनी त्यांचे स्वागत केले. सर्व लहान मोठ्या पदाधिका-यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. फत्तेपूर येथील एक एकर क्षेत्रात चारा पिकाचे बियाणे घेवून पंधरा लाखाचे उत्पन्न घेतलेल्या अल्पभूधारक शेतकरी सोमेश्वर लवांडे यांचा त्यांनी सत्कार केला. नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात नव्याने बांधण्यात आलेल्या 29 कांदा आडतदार व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन केले. येथेही त्यांनी शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवेंबरोबर चर्चा केली. कांदा लिलाव व राज्यात प्रसिद्ध असलेल्या जनावरांच्या बाजाराबाबत त्यांना माहिती देण्यात आली.