कळसूबाई शिखरावर पर्यटकांना पुन्हा बंदी!
नायक वृत्तसेवा, राजूर
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बारी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे. ट्रेकिंगचा छंद असलेल्या हजारो पर्यटकांची इथे रेलचेल असते. तसेच शिखरावर मंदिर असल्याने दर्शनासाठी गर्दी होते. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात तिसर्या लाटेचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणार्या लोकांसाठी कळसूबाई शिखर काही दिवस बंद राहणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना बाहेरून येणार्या पर्यटकांकडून बाधा होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.