निमोणच्या ‘यशवंत’चे चेअरमन अडकले कचाट्यात! खासदार राणावत यांच्यावरील टीका; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्ञानदानाचे मंदिर समजल्या जाणार्‍या विद्यालयात स्वातंत्र्य दिनी क्रांतिकारकांचे शौर्य सांगण्याचे सोडून आपली राजकीय पोळी भाजू पाहणार्‍या वकिलाचा पाय कचाट्यात अडकला आहे. स्वातंत्र्य दिनी तालुक्यातील निमोण येथील यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सदरचा प्रकार घडला होता. या संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्‍वर हरिभाऊ सांगळे यांनी ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाजपच्या खासदार कंगणा राणावत यांच्याबाबत चंदीगड विमानतळावर घडलेल्या घटनेचा विक्षिप्तपणे उल्लेख करुन उपस्थित विद्यार्थीनींना भडकावण्याचा प्रयत्न करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने निमोणमध्ये आंदोलन केले. त्यामुळे घाबरलेल्या शाळेच्या प्राचार्यांनी जाहीर माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देताच तालुका पोलिसांनी सांगळे यांच्याविरोधात देह, लौकीक अथवा मालमत्तेला क्षती पोहोचवण्यासाठी धमकी देणे, प्रतिष्ठेला धक्का लावणे व अब्रु नुकसान करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना तालुक्यातील निमोण येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक मंडळाच्या यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली होती. यावेळी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले शाळेचे चेअरमन ज्ञानेश्‍वर हरिभाऊ सांगळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खरेतर त्यांना क्रांतिकारकांचे बलिदान, देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी आजच्या विद्यार्थी दशेतील मुलांची भूमिका, शिक्षण व व्यवसायाविषयक मार्गदर्शन या गोष्टींवर भर देण्याची गरज असताना त्यांनी सवयीप्रमाणे समोर बसलेल्या प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसमोर राजकीय भाषणबाजी करण्यास सुरुवात केली.


यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर करुन त्यांची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडून आलेल्या भाजप खासदार कंगणा राणावत यांच्यावर टीकेची झोड उठवली. दोन महिन्यांपूर्वी चंदिगड विमानतळावर एका महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. या घटनेच्या मागे संबंधित सुरक्षा कर्मचार्‍याचा व्यक्तिगत विषय असताना ज्ञानेश्‍वर सांगळे यांनी त्याला नव्याने राजकीय फोडणी देत ‘त्या’ महिला सुरक्षा रक्षकाचे त्यावेळी देशाने कौतुक केल्याचा खोटा उल्लेख केला. यावेळी त्यांनी उपस्थित मुलींना शिकून डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानीक, व्यावसायिक अथवा उच्चाधिकारी व्हा असा सल्ला देणं सोडून ‘तुम्हीपण शिकून ‘त्या’ महिला सुरक्षा कर्मचार्‍यासारखे काम करा’ असा अजब सल्ला देवून टाकला.

सदरील कार्यक्रम गावातील शाळेत आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचीही मोठी गर्दी होती. त्यातील काहींनी पेशाने वकील आणि हुद्द्याने शाळेचे चेअरमन असलेल्या ज्ञानेश्‍वर सांगळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काढून तो समाज माध्यमांवर टाकला. त्याचा राग येवून सांगळे यांनी सकाळी अकराच्या सुमारास तिघांसह गावातील भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ऋषीकेश कांडेकर यांच्या घरी जावून ‘तु माझ्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करतोस का?’ असे म्हणतं त्यांना शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी ‘गावात आल्यावर तुझं तंगडेच मोडतो’ अशी धमकीही कांडेकर यांना भरली.


हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर भाजपचे विधानसभा अध्यक्ष अमोल खताळ, भीमराज चत्तर, सरपंच संदीप देशमुख, विठ्ठल घोरपडे, वैभव लांडगे, राजू सोनवणे, कविता पाटील, राहुल भोईर, सुयोग गुंजाळ, रोहिदास साबळे, संदेश देशमुख, अशोक नन्नावरे आदींसह स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शाळेसमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी गडबडलेल्या शाळेच्या प्राचार्यांनी आंदोलकांची भेट घेत स्वातंत्र्यदिनी शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली. यानंतर आंदोलनकांनी तालुका पोलीस ठाण्यात येवून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


त्यानुसार पोलिसांनी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ऋषीकेश कांडेकर यांची फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेचे कलम 351 (2) देह, लौकीक अथवा मालमत्तेला क्षती पोहोचवण्यासाठी धमकी अथवा धाकदपटदशा करणे, 352 शांतता भंग करण्यासाठी अपमान करणे व 356 (2) अब्रु नुकसान केल्याबद्दल सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेच्या निमोण येथील यशवंत शाळेचे चेअरमन ज्ञानेश्‍वर हरिभाऊ सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शालेयस्तरावर होणार्‍या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा आणि देशाच्या प्रगतीबाबत माहिती देवून त्यांच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करण्याचे काम घडावे असे अपेक्षित असते. मात्र सत्तेच्या लालसेने काहीजण कोवळ्या मुलांसमोरही आपला राजकीय पट सोडण्यास तयार नसतात. असेच उदाहरण निमोणच्या घटनेतून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या शाळेच्या अध्यक्षपदी असलेल्या वकिलांनी स्वातंत्र्य दिनाचे संकेत पायदळी तुडवून चक्क विद्यार्थ्यांच्या मनात विरोधी पक्षाविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदरची कृती अत्यंत संतापजनक असून या महाशयांना चेअरमनपदावरुन दूर करावे अशीही मागणी आता होत आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 19095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *