राज्यमंत्री तनपुरेंवरील आरोप बिनबुडाचे ः मापारी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हे राहुरी मतदारसंघासह सर्व जिल्हा जाणून आहे. त्यांचा पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात काडीचाही संबंध नाही. परंतु राजकीय भांडवल करुन त्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव येथील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मांडला असून तनपुरे यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व नैराश्यातून केले असल्याची प्रतिक्रिया राहुरी काँग्रेस नगरपालिकेचे निरीक्षक व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्याने राज्यातील व जिल्हातील भाजप नेते सत्ता नसल्याने स्वैरभैर झाले आहे. त्यांची अवस्था ‘ना घाट का ना घर का’ अशी झाली आहे. त्यातच राहुरीचे विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून गेले व मंत्रिमंडळात लगेच राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांची मोठी पोटदुखी स्थानिक भाजप नेत्यांना झाली. तनपुरेंचा राज्याच्या राजकारणातील वाढता उत्कर्ष या भाजपच्या नेत्यांना पाहवत नाही. स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे यांना सगळं पिवळंच दिसायला लागले म्हणूनचं त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन बदनाम करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे, असे श्रीकांत मापारी यांनी म्हटले आहे.