घारगाव पोलीस ठाण्याच्या माथी आता वाटमारीचाही कलंक! मदतीच्या बहाण्याने नोकरदाराला लुटले; लाखाची रोकड घेवून दोघे पसार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार चर्चेत येवून नागरी संतापाचे कारण ठरत असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या निष्क्रिय कारकीर्दीत आणखी एक कलंक नोंदवला गेला आहे. या घटनेत वाहनात बिघाड झाल्याच्या संशयावरुन महामार्गावर थांबलेल्या नोकरदाराची मदत करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी फसवणूक केली. काही क्षणात घडलेल्या या प्रकारात राहुल गाडेकर या तरुणाच्या कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून एक लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर ‘त्या’ दोघांचे थांबणे संशयास्पद वाटल्यानंतर गाडेकर यांनी बॅग तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला सोमवारी सायंकाळी उशिराने याबाबत घारगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. त्याच दिवशी घारगावच्या ज्ञानमंदिरातही चोरट्यांनी धुडगूस घातल्याने त्याचा रोष खद्खद्त असताना त्यात आता वाटमारीच्या घटनेचीही भर पडल्याने येणार्या काळात पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या बदलीसाठी जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही.

तात्पूरता पदभार असताना कर्तव्याला अनुसरुन भूमिका बजावित पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात आपले स्थान बळकट केले. या दरम्यान पठारभागातील एका स्थानिक पुढार्याला हाताशी धरुन या महाशयांनी लोणीचा आशीर्वादही प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी जो गिअर बदलला, तो आजवर घारगाव पोलीस ठाण्याची गाडी रुळावर येण्यास तयार नाही. सर्वप्रकारच्या अवैध व्यवसायांचे अक्षरशः स्तोम माजले. पोलीस ठाण्यात जायचे असले तर खिशा भरलेलाच पाहिजे अशी या पोलीस ठाण्याची अवस्था बनली. कधीनव्हे ते अगदी ग्रामस्थांच्या यात्रा कमिट्यांनाही परवानगीसाठी नागवले गेले. त्याची बोंबही उठली, पण आपल्या देशात एकदा राजकीय आशीर्वाद मिळाला की नंतर अधिकार्याला कोणाचेही भय राहत नाही, त्याप्रमाणे येथील वातावरण तसेच बदलत गेले.

एकीकडे दररोज चोर्या, घरफोड्या, हाणामार्यांसह अगदी खुनाच्या घटनाही घडून गेल्या, मात्र या महाशयांच्या येथील संपूर्ण कारकीर्दीत त्यातील एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. म्हणायचेच झाले तर मध्यंतरीच्या खुनाच्या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी लावला होता. तर वर्ष उलटूनही अन्य एका खुनाचा तपास अजूनही ठप्पच आहे. उपअधीक्षकांच्याच आदेशाने पोखरी बाळेश्वरच्या वेश्याव्यवसायावर छापा घातला गेला, मात्र तेथेही मोठे गौडबंगाल दिसून आले. ज्या ग्राहकांचे खिसे भरलेले होते त्यांना त्या भागातील डोंगरात अदृष्य करण्यात आले, तर ज्यांच्याकडे द्यायला काही नव्हते, ते मात्र गजाआड गेले अशीही जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन घारगाव पोलीस काहीच सोडीत नसल्याचे दिसत असल्याने पठारभागात सध्या गुन्हेगार आणि चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.

त्यातही धक्कादायक ठरणारी घटना आता समोर आली असून निरंतर वाहणार्या पुणे-नाशिक महामार्गावर पठारभागात बहुधा पहिल्यांदाच वाटमारीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत मूळच्या बोट्याच्याच मात्र सध्या नोकरीनिमित्त अकोल्यात वास्तव्यास असलेला राहुल सुदाम गाडेकर हा तरुण पहाटे सव्वातीनच्या सुमारास आपल्या कारमधून पुण्याला जायला निघाला होता. बोट्यापासून काही अंतरावर असलेल्या माळवाडी शिवारात त्याचे वाहन आले असता पाठीमागील बाजूने अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे आपल्या वाहनात काही बिघाड झाला की, कोणता भाग तुटला अशी शंका निर्माण झाल्याने गाडेकर यांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले व ते खाली उतरुन आवाज कोठून आला त्याचा शोध घेवू लागले.

त्याचवेळी दोघेजण त्यांच्याकडे चालत आले. संगमनेर तालुका अद्याप वाटमारीच्या घटनांपासून दूर असल्याने, त्यांना पाहुन त्यांच्या मनात कोणतीही शंका आली नाही. आसपासचे कोणीतरी आपल्या मदतीसाठी येत असेल असा भाव ठेवून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ‘ते’ दोघेही तेथे आले आणि निघूनही गेले. नंतर कानावर आलेला आवाज दुसराच काहीतरी असेल, वाहनाला काहीच झाले नसल्याचे पाहून राहुल गाडेकरही वाहनात बसले आणि पुण्याच्या दिशेने निघाले. मात्र त्याचवेळी त्यांना ‘त्या’ दोघांचे थांबणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी वाहन थांबवून आपली बॅग तपासली असता त्यातील एक लाख रुपयांची रोकड गायब झाल्याचे त्यांना दिसले.

याबाबत त्यांनी सोमवारी (ता.12) घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस नाईक आर.के.कोरडे यांच्याकडे दिला आहे. सदरचा प्रकार ज्या दिवशी घडला, त्याच दिवशी घारगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी यथेच्छ धुडगूस घातला होता. या संतापजनक घटनेत विकृत चोरट्यांनी मुलांच्या पोषण आहारातील अंडी मनसोक्त तळून खाल्ल्यानंतर उर्वरीत अंडी फोडून टाकण्यासह तेलाच्या पिशव्या फोडून त्यातील तेल शाळेच्या भिंतींसह फरशा व संगणक प्रयोगशाळेत सर्वत्र उडवले. अन्नधान्य व भाजीपाल्याची नासाडी केली, शेगड्या फेकून देत गॅस सिलेंडरचा प्रवाह मात्र जाणीवपूर्वक सुरुच ठेवला.

या घटनाक्रमातून चोरट्यांच्या हेतूविषयी संशय निर्माण झालेला असताना घारगाव पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती. मात्र शिक्षकांनी पोलिसांना कळविल्यानंतर तब्बल दोन तासांनी हाकेच्या अंतरावरील पोलीस ठाण्यातून एक कर्मचारी आला आणि उद्धटपणे बोलून पुन्हा दोन तासांनी म्हणजे 11 वाजता तक्रार द्यायला ठाण्यात या! असे शाही फर्मान सोडून निघूनही गेला. निष्क्रियतेच्या झापडीत घारगाव पोलिसांना बालगोपाळांच्या जीविताचेही गांभीर्य कळत नसल्याने घारगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, त्यातच आता पठारभागात बहुधा पहिल्यांदा ‘वाटमारी’ही सुरु झाल्याने पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या विरोधात आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे. घारगावच्या ग्रामस्थांनी शनिवारीच तसे संकेत दिले होते. तत्पूर्वीच पोलीस अधीक्षकांनी त्यांची उचलबांगडी करुन घारगाव पोलिसांची राहिलेली लक्तरे अबाधित ठेवावी अशी अपेक्षा पठारभागातील काहींनी व्यक्त केली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागाचा विस्तार 46 गावांचा आहे. त्यावर नियंत्रण आणि शांतता सुव्यवस्था ठेवण्याचे काम घारगाव पोलीस ठाण्यातंर्गत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत पठारभागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वेगवेगळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावल्याने गुन्हेगारी घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यातून हप्तेखोरी वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही विपरित परिणाम झाला आहे. गुन्ह्यांचे तपासच लागत नसल्याने मनोबल वाढलेले चोरटे मनात येईल तशाप्रकारे घटनांना आकार देत आहेत. गेल्या काही महिन्यांत पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर येवूनही वरीष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.

