श्रीरामपूर पालिकेचा स्वच्छता ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील पालिकेने दिलेला शहर स्वच्छतेचा ठेका ठेकेदाराने अर्धवट सोडून दिल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आणि जप्तीच्या रकमेतून सफाई कामगारांचे पगार करण्याचा निर्णय पालिकेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
श्रीरामपूर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, नगराध्यक्षा आदिक यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असून, ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका परवडणार नाही, कामगारांना पगारासाठी पुरेसे पैसे नाही असे भाकित त्यांनी केले असल्याचे निदर्शनास आणून देत ते आज खरे ठरल्याचे म्हणाले. त्यावर नगराध्यक्षांनी असे वैयक्तिक आरोप केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने पालिकेचे काम सोडून बरेच दिवस उलटून गेले आहेत. परंतु पालिकेने अद्यापही कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप नगरसेवक संजय फंड, किरण लुणिया, मुजफ्फर शेख यांनी केला. त्यावर नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन काळ्या यादीत टाकण्याबाबत जिल्हाधिकार्यांशी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच जप्तीच्या रकमेतून सफाई कामगारांचे पगार केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच घनकचरा ठेका प्रक्रियेत प्रशासकीय चुका आढळून आल्याने मुख्याधिकार्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेकांनी केली. दरम्यान, यापूर्वी विविध ठेकेदारांवर अनेक गुन्हे दाखल असून, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नगरसेवक अंजुम शेख, भारती कांबळे, राजेश अलग, मुक्तार शहा म्हणाले. यांसह विविध विषयांवर चर्चा करुन नवीन ठेका देण्याबाबत ज्येष्ठ नगरसेवकांशी विचार विनिमय करावा असे सर्वानुमते सांगितले.