राज्य सरकारने नियमावली शिथील करावी! कोपरगाव व्यापारी समितीची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित बंद ठेवण्यास प्रशासनास आदेश बजावले आहेत. यामुळे 5 एप्रिलपासून लागू झालेल्या मिनी लॉकडाऊनमुळे छोट्या-मोठ्या व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याचा परिणाम घेतलेले कर्ज आणि घरखर्च फेडण्यावर होत आहे. म्हणून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी नियमावली शिथील करावी, अशी मागणी कोपरगाव व्यापारी समितीने रविवारी (ता.11) निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात व्यापारी समितीने म्हंटले आहे की, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तेव्हाही लॉकडाऊन लागू केल्यामुळे जनजीवन आणि व्यवसाय ठप्प झाले होते. आता गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा हाहाकार उडाला असून छोटे-मोठे व्यवसाय करण्यास राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीमुळे निर्बंध आले आहेत. याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होत असून हातउसने घेतलेले पैसे, कर्ज, हफ्ते, दवाखाना, दुकान भाडे, वीजबिल, शिक्षण आदींवर होऊ लागला आहे.
यातून सकारात्मक मार्ग निघाला नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. किंवा परिवारासह इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील निवेदनातून केली आहे. यावर अकबर शेख, निसार शेख, शरद खरात, अजय विघे, रवी जगताप यांच्या सह्या आहेत.