जिल्हा पोलीस दलासाठी शनिवार ठरला सुखद्! संगमनेरातील दारुचे दुकान फोडणार्‍या दोघांकडून अवघ्या 48 तासात निम्मा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
घटनामागून घटना घडूनही आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने जिल्हा पोलीस दल हतबल झाले होते. तीन महिन्यांपूर्वी घडलेले रेखा जरे हत्याकांड असो अथवा बेलापूरातील व्यापारी गौतम हिरेण यांचे अपहरण असो पोलीस त्याचा छडा लावण्यात सपशेल अपयशी ठरल्याने जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शंका व्यक्त होवू लागल्या होत्या. मात्र आजचा शनिवार या सर्व शंका पुसणारा आणि पोलिसांचे मनोबल वाढवणारा ठरला आहे. सकाळी फरार बोठे हाती लागल्याच्या वार्तेने उगवलेला आजचा दिवस व्हाया बेलापूरमार्गे संगमनेरातील दारु चोरीची उकल करीत मावळल्याने हतबल झालेल्या पोलिसांचा उत्साह पुन्हा एकदा गगनाला भिडला आहे.


गेल्या 30 नोव्हेंबररोजी पारनेरनजीकच्या जातेगाव घाटात यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास करतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांतच प्रत्यक्ष खून करणार्‍या दोघांसह अन्य तिघांना त्या गुन्ह्यात अटक केली. मात्र त्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे मात्र पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार झाला. त्यानंतर गेली तीन महिने पोलिसांनी राज्यासह परराज्यातही शंभराहून अधिक ठिकाणी छापेमारी केली, मात्र प्रत्येकवेळी पोलिसांच्या हाती निराशाच लागली.


याच दरम्यान गेल्या 1 मार्चरोजी बेलापूरातील व्यापारी गौतम हिरेण यांच्या अपहरणाचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर सहा दिवस उलटूनही पोलिसांना हिरेण यांचा शोध घेता आला नाही. त्यातच त्यांचा मृतदेह आढळून आल्याने श्रीरामपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. या दरम्यान जिल्ह्यात चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार घडतच होते. त्यामुळे पोलिसांबाबत समाजामध्ये काहीसा नाराजीचा सूरही निघू लागला होता. संगमनेरातही गेल्या 1 मार्चपासून विविध ठिकाणी चोर्‍या व घरफोड्या झाल्याचे समोर आले. काहींचे तपासही लागले, तर अनेक प्रकरणं अद्यापही तपासातच आहेत. त्यातच गेल्या गुरुवारी (ता.11) घुलेवाडी शिवारातील हॉटेल सम्राटमध्ये घरफाडी झाली व चोरट्यांनी रोकडसह बारा हजारांची विदेशी दारु घेवून पोबारा केला.


या प्रकरणात मात्र फिर्यादी गौतम कालडा यांनी संशयितांची नावेही सांगीतल्याने पोलिसांचे निम्मे काम आधीच फत्ते झाले होते, विषय होता फक्त आरोपीला गजाआड करण्याचे. जिल्ह्यातील अशा सगळ्या वातावरणात आजचा शनिवार उगवला तो पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा हेतू घेवूनच. भल्या सकाळीच रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैद्राबादच्या खतरनाक समजल्या जाणार्‍या बिलालनगरमधून उचलण्यात आले. ही वार्ता पोलिसांसाठी खुप सुखद् होती. त्यानंतर माध्यान्नाच्या सुमारास बेलापूरातील व्यापारी गौतम हिरेण यांच्या हत्याकांडाची उकल करीत टप्प्याटप्प्याने पाच आरोपींना अटक केली आणि हिरेण प्रकरणाचा तपास पूर्ण केला.


आज भल्या पहाटे सुरु झालेल्या सुखद् वार्तांचा सिलसिला सूर्यास्तापर्यंत कायम राखीत शहर पोलिसांनी सुखद वार्तेत एकची भर घातली आणि दारुच्या दुकानातील घरफोडीतील दोन्ही आरोपी जेरबंद करीत चोरुन नेलेली सगळी दारु आणि निम्मी रक्कम असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी सराईत गुन्हेगार अविनाश विलास देवकर (वय 20), संदीप उर्फ जब्ब्या संजय वाल्हेकर (वय 19, दोघेही रा.घुलेवाडी) या दोघांना अटक केली. या चोरीसाठी या दोघांनी घुलेवाडीतून एक दुचाकीही चोरली होती. ती देखील पोलिसांनी हस्तगत केली.


आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एकामागून एक तीन सुखद् वार्ता येवून धडकल्याने जिल्ह्यात पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधानाचे वातावरण तयार झाले. यासर्व घडामोडीत गेल्या तीन महिन्यांपासून बाळ बोठेच्या मागे धावणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल, तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, बेलापूर प्रकरणात अप्पर अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मिथून घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, आदींसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, संगमनेरच्या घरफोडी प्रकरणात पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पो.ना.विजय खाडे, विजय पवार, फुरकान शेख (श्रीरामपूर), आशिष आरवडे, पो.कॉ.अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे या सर्वांनी मोठे परिश्रम घेतल्याने आजचा दिवस संपूर्ण जिल्हा पोलीस दलासाठी सुखद् धक्के देणारा ठरला.

Visits: 23 Today: 1 Total: 116119

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *