संगमनेर तालुक्यातील निम्म्या गावप्रमुखांच्या निवडी पूर्ण! वडगावपानमध्ये बाबा ओहोळांना तर डिग्रसमध्ये काँग्रेसला धक्का

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामपंचायतींच्या निवडणूका आटोपल्यानंतर जवळपास पंचवीस दिवसांनी गावप्रमुखाच्या निवडी करण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील एकूण 94 ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रीया राबविण्यात आली. त्यातून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या डिग्रस येथील ग्रामपंचायतीवर तब्बल 35 वर्षांनंतर सत्तांतर घडले तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांचा वरचष्मा असलेली वडगावपान ग्रामपंचायत बहुमत हाती असूनही त्यांच्या ताब्यातून सुटली. या दोन धक्कादायक गोष्टी वगळता उर्वरीत 41 ठिकाणी थोरात गटाचे वर्चस्व राहीले, तर आरक्षण चुकल्याने पाच ठिकाणची सरपंचपदे रिक्त ठेवावी लागली. उर्वरीत 46 ग्रामपंचायतीच्या प्रमुखांच्या निवडी गुरुवारी (ता.11) होणार आहेत.

यंदाच्या निवडणूकीत थोरात विरुद्ध विखे असा संघर्ष असलेल्या चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका अत्यंत रंगतदार झाल्या होत्या. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य खिळले होते. त्यानुसार विखे गटाने डिग्रस येथील ग्रामपंचायतीवर गेल्या 35 वर्षांपासून अधिराज्य गाजवणार्या काँग्रसेलाच सुरुंग लावला आणि काँग्रेससोडून भाजपाच्या गटात सहभागी झालेल्या रखमाजी बाळाजी खेमनर यांच्याहाती गावच्या सत्तेची सूत्रे आली. तर उपसरपंचपदी रंगनाथ भाऊसाहेब बिडगर यांची निवड झाली आहे.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांचे वर्चस्व असलेल्या वडगावपान येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत मात्र ‘चमत्कार’ बघायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूकीत तेरापैकी सात जागा जिंकून ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने वर्चस्व निर्माण केले होते. मात्र सरपंचपदाच्या निवडीवेळी ते ‘गाफिल’ राहिल्याने दुसर्या गटाच्या श्रीनाथ कोंडाजी थोरात यांनी त्यांच्या कंपूतील एका सदस्याचा गळ टाकून अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. ओहोळ यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मात्र ओहोळ गटाच्या सोमनाथ बाळू गायकवाड यांची निवड झाली.

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये सदस्य निवडी बिनविरोध झाल्याने तेथे निवडणुका झाल्या नव्हता. सरपंचपदाच्या निवडीतही हा प्रयोग दिसून आला. कर्हे, पिंपळगाव माथा, कौठे बु., लोहारे, नांदुरी दुमाला, खांबे व खांजापूर या सात ठिकाणी निवडणूका टाळून सौहार्दाने गावप्रमुखाच्या निवडी करण्यात आली. कर्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडू मोघाजी सानप, उपसरपंचपदी ताई सुनील गुळवे. पिंपळगाव माथा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सारंग पांडे व उपसरपंचपदी नारायण नाना भांगरे. कौठे बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशिष शिवाजी वाकळे, उपसरपंचपदी किरण पोपट वाकळे. लोहारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताराबाई गंगाराम सोनवणे, उपसरपंचपदी राहुल कारभारी पोकळे.

नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्चना मीनानाथ शेळके, उपसरपंचपदी सोनबा लहानू पथवे. खांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रवींद्र सीताराम दातीर व उपसरपंचपदी भारत विठ्ठल मुठे तर खांजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तुषार संपत सातपुते आणि उपसरपंचपदी गोविंद लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय खरशिंदे येथील अशोक भास्कर बर्डे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उर्वरीत ग्रामपंचायतींमध्ये ओझर बु.च्या सरपंचपदी स्वाती गणेश खेमनर, उपसरपंचपदी संदीप दत्तात्रय नागरे. रायतेवाडीच्या सरपंचपदी सतीष गोरक्षनाथ तनपुरे, उपसरपंचपदी हरिभाऊ नाराय मंडलिक. कौठे धांदरफळच्या सरपंचपदी विकास बबन घुले, उपसरपंचपदी आशा संदीप क्षीरसागर. कुरणच्या सरपंचपदी मुदस्सर मन्सूर सय्यद, उपसरपंचपदी नदीम पीरमहंमद शेख. खरशिंदेच्या सरपंचपदी सविता भाऊराव वाडेकर, उपसरपंचपदी अशोक भास्कर बर्डे (बिनविरोध). नांदूर खंदरमाळच्या सरपंचपदी जयवंत गणपत सुपेकर, उपसरपंचपदी दिलीप काशिबा दुधवडे. जवळेबाळेश्वरच्या सरपंचपदी रामकृष्ण नाथा पांडे, उपसरपंचपदी अतुल हरिभाऊ कौटे. खांडगावच्या सरपंचपदी भरत भीमाशंकर गुंजाळ, उपसरपंचपदी लक्ष्मीबाई संपत गुंजाळ.

कुरकुंडीच्या सरपंचपदी शाहीन पप्पू चौगुले, उपसरपंचपदी वनिता शरद वायळ. चणेगावच्या सरपंचपदी अशोक गेणू खेमनर, उपसरपंचपदी गीतांजली विठ्ठलदास आसावा. माळेगाव पठारच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर मुरलीधर पांडे, उपसरपंचपदी सुभाष भीमा गोडे. झरेकाठीच्या सरपंचपदी अशोक नानासाहेब वाणी, उपसरपंचपदी सुरज याकोब म्हंकाळे. भोजदरीच्या सरपंचपदी शिल्पा नीलेश पोखरकर, उपसरपंचपदी विनायक संतू शिंदे. प्रतापपूरच्या सरपंचपदी दत्तात्रय बाळकृष्ण आंधळे, उपसरपंचपदी संगीता गजानन आव्हाड. शिरसगाव धुपेच्या सरपंचपदी रामनाथ सखाराम गोडे, उपसरपंचपदी प्रवीण बबन दिघे. रायते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रूपाली गौतम रोहम, उपसरपंचपदी सूरज कैलास पानसरे.

देवगावच्या सरपंचपदी अर्चना सुनील लामखडे, उपसरपंचपदी सुनील मोहनराव शिंदे. देवकौठेच्या सरपंचपदी ज्योती नंदू मोकळ, उपसरपंचपदी ज्योती राजेंद्र कहांडळ. चंदनापुरीच्या सरपंचपदी शंकर दत्तात्रय रहाणे, उपसरपंचपदी भाऊसाहेब रंगनाथ रहाणे, मंगळापुरच्या सरपंचपदी शुभांगी रमेश पवार, उपसरपंचपदी लक्ष्मणराव नंदू भोकनळ, औरंगपूरच्या सरपंचपदी लक्ष्मी भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंचपदी इंद्रभान बाबुराव तांबे. पिंपळेच्या सरपंचपदी मीना अण्णासाहेब ढोणे, उपसरपंचपदी तुकाराम सखाराम चकोर. कोंंची-मांचीच्या सरपंचपदी अमृता जयराम भास्कर, उपसरपंचपदी सोमनाथ ज्ञानदेव जोंधळे.

कौठेे खुर्दच्या सरपंचपदी विलास दत्तात्रय मेंगाळ, उपसरपंचपदी गोरक्षनाथ नाना ढोकरे. हिवरगाव पठारच्या सरपंचपदी सुप्रिया प्रकाश मिसाळ, उपसरपंचपदी दत्तात्रय रावसाहेब वनवे. म्हसवंडीच्या सरपंचपदी सुरेखा जयसिंग इथापे, उपसरपंचपदी मंगेश भागा बोडके. माळेगाव हवेलीच्या सरपंचपदी संदीप संपत गायकवाड, उपसरपंचपदी गंगुबाई कैलास जंबुकर. निमगाव खुर्दच्या सरपंचपदी संदीप राधाकिसन गोपाळे, उपसरपंचपदी राहुल राजीव चंद्रमोरे. सुकेवाडीच्या सरपंचपदी योगिता भाऊसाहेब कुटे, उपसरपंचपदी सुभाष सखाराम कुटे. शिबलापुरच्या सरपंचपदी सचिन विनायक गायकवाड, उपसरपंचपदी दिलीप तबाजी मुंन्तोडे, सांगवीच्या सरपंचपदी विमल बाळचंद कातोरे, उपसरपंचपदी नवनाथ नाना कातोरे. सोनोशीच्या सरपंचपदी सुदाम बाळू गिते, उपसरपंचपदी राजेंद्र तुकाराम सानप व खंदरमाळवाडीच्या सरपंचपदी शिवाजी मनाजी फणसे व उपसरपंचपदी शुभांगी शरद शिरोळे यांची मंगळवारी निवड झाली आहे.

यंदा निवडणूकांनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. मात्र आरक्षणाच्या सोडती काढताना प्रत्यक्षात त्या श्रेणीतील उमेदवार तेथे निवडून आला आहे का? याचा ताळमेळ जुळविला गेला नाही. त्यामुळे तालुक्यातील पाच ठिकाणच्या सरपंचपदाच्या जागा रिक्त ठेवाव्या लागल्या. मात्र तेथील उपसरपंचपदाच्या निवडी पार पडल्याने आता फेर आरक्षण लागेपर्यंत उपसरपंचांच्या हातीच ग्रामपंचायतींचा कारभार असणार आहे. त्यात खळीच्या उपसरपंचपदी राजेंद्र नामदेव चकोर, मिरपूरच्या उपसरपंचपदी कमलबाई अण्णा कापकर, चिखलीच्या उपसरपंचपदी रत्नमाला अण्णासाहेब हासे, सावरगाव घुलेच्या उपसरपंचपदी नामदेव कोंडाजी घुले तर शिंदोडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पोपट सोमा कुदनर यांच्या निवडी झाल्या आहेत.

