गौतम हिरण हत्याकांड; पोलिसांनी चौघांच्या आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोबाईल आणि कार केली जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे 1 मार्च रोजी अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्यांचा वाकडी परिसरात 7 मार्चला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल असून समांतर तपास चालू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथकांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगवेगळी पथके तयार करुन स्वतः पथकाचे नेतृत्व करुन गुन्ह्याचा तपास केला. विशेष म्हणजे आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तरी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले.

यामध्ये प्रथम संदीप मुरलीधर हांडे (वय 26, रा.माळेगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक) यास नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यानंतर जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय 25, रा. सप्तश्रृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर, जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (वय 26, रा.पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर, जि.नाशिक), नवनाथ धोंडू निकम (वय 29, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर) व एक 22 वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी व्यापारी गौतम हिरण यांचा रियल मी कंपनीचा मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती कार (क्रं.एमएच.15, जीएल.4387) असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहा. फौजदार सोन्याबापू नानेकर, मुख्य हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे, विशाल गवांदे, पोलीस शिपाई योगेश सातपुते, संदीप दरंदले, रवींद्र धुंगासे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, राहुल सोळंके, रोहित येमूल, आकाश काळे, चालक उमाकांत गावडे, भरत बुधवंत, अर्जून बडे, बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, फुरकान शेख, प्रमोद जाधव आदिंनी केली आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 136 Today: 1 Total: 1578474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *