संगमनेर पत्रकार मंचच्या अध्यक्षपदी श्याम तिवारी उपाध्यक्षपदी नितीन ओझा तर सचिवपदी गोरक्षनाथ मदने यांची फेरनिवड
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील संगमनेर पत्रकार मंचच्या अध्यक्षपदी श्याम तिवारी, उपाध्यक्षपदी नितीन ओझा तर सचिवपदी गोरक्षनाथ मदने यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेल्या वर्षभराच्या कोविड काळात पत्रकारांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल अभिनंदनाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. संपूर्ण वर्ष कोविडच्या सावटात गेल्याने पदाधिकार्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत सतीश आहेर यांनी तिघांनाही पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव मांडला, त्याला बहुतेक सर्व सदस्यांनी पाठिंबा देत आगामी वर्षासाठी या तिघांचीही एकमुखाने फेरनिवड करण्यात आली.

सोमवारी (ता.8) शासकीय विश्रामगृहात संगमनेर पत्रकार मंचची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे सचिव गोरक्षनाथ मदने यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. अध्यक्ष श्याम तिवारी यांनी गेले संपूर्ण वर्ष कोविडच्या संकटातच सरल्याचे सांगताना या कालावधीत आपल्या वृत्तपत्र व माध्यमाच्या वाचक व प्रेक्षकांसाठी पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता वृत्तांकनाचे काम केले. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून संघटनेने पत्रकारांची आरोग्य तपासणी, मास्क व सॅनिटायझरचे वितरण, कोविडने जायबंदी झाल्यास स्थानिक पत्रकारांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयाशी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.

वस्तुनिष्ठ वृत्तांकन करीत असताना प्रसंगी अनेकवेळा संबंधिताच्या रोषाचा सामना करावा लागतो. अशावेळी संघटनेचे पाठबळ असणे आवश्यक असते. त्या भावनेतूनच संगमनेर पत्रकार मंचची स्थापना झाली असून या माध्यमातून शहरातील पत्रकारांनी निर्भयतेने काम करावे असा हेतू असल्याचे तिवारी म्हणाले. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही संघटनेचे काम सुरू राहणार असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी संलग्न राहण्याचा सतत प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. उपाध्यक्ष नितीन ओझा यांनी आजच्या ग्रामीण पत्रकारांसमोर असलेली आव्हाने विशद करताना संघटनेचे महत्त्व पटवून दिले. मदने यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले. या बैठकीला सर्वश्री सुनील नवले (लोकसत्ता), आनंद गायकवाड (सकाळ), शेखर पानसरे (लोकमत), अंकुश बुब (सार्वमत), गोरक्ष नेहे (पुढारी), सोमनाथ काळे (जनप्रवास), सतीश आहेर (गांवकरी), अमोल मतकर (प्रभात), नीलिमा घाडगे (केसरी), भारत रेघाटे (भास्कर), राजू नरवडे (नवराष्ट्र), सुनील महाले (आनंद), बाबासाहेब कडू (सी न्यूज) व काशिनाथ गोसावी (प्रेस फोटोग्राफर) आदी सदस्य उपस्थित होते.
