प्रलंबित अहवालांनी भरवली संगमनेरकरांना धडकी! तालुकास्तरावरील सर्व उच्चांक मागे टाकीत संगमनेरात सहाशेहून अधिक रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुकास्तरावरचे आजवरचे सर्व विक्रम उच्चांक टाकीत संगमनेर तालुक्यात आज धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे. गेल्या तेरा महिन्यातील कोविड संक्रमणात जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळता चौदा तालुक्यांत एकाच दिवशी आढळलेली ही सर्वाधीक रुग्णसंख्या आहे. आजच्या या उच्चांकी रुग्णवाढीने तालुक्याचा सरासरी वेग गतीमान होणार असला तरीही आज समोर आलेली रुग्णसंख्या गेल्या 48 तासांतीलच नव्हे तर मागील सहा-आठ दिवसांतील प्रलंबित अहवालांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रलंबित अहवालांमध्येही संगमनेर शहरातील रुगगतीला ओहोटी लागल्याचे दिसून आले असून आजच्या एकूण 617 मध्ये शहरातील अवघ्या 32 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालातील अनेक रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घरही गाठले आहे हे विशेष.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील कोविडचे संक्रमण ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्याचवेळी संगमनेर व अकोले तालुक्यातील संक्रमणाचा वेग मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्व ठिकाणी विनाकारण भटकणार्यांच्या रॅपीड चाचण्याही सुरु झाल्या आहेत, त्यांचा निष्कर्ष लक्षात घेता आजही अनेक महाभाग संक्रमित असूनही गावभर फिरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अनेकांना संसर्ग होवून प्रादुर्भाव वाढतच असल्याचे धक्कादायक चित्रही समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य, पालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने कितीही नियोजन केले, आवाहन केले तरीही जो पर्यंत नागरिक स्वतः आपली जबाबदारी ओळखणार नाहीत तो पर्यंत जिल्ह्यातील संक्रमण आटोक्यात आणणे म्हणजे फुटल्या घड्यात पाणी भरण्यासारखे ठरणार आहे.
मात्र संगमनेर तालुक्यात आज समोर आलेल्या एकूण रुग्णसंख्ये एवढी प्रचंड गती सध्यातरी तालुक्यात नाही हे उपलब्ध माहितीवरुन समोर आले आहे. यापूर्वी शासकीय यंत्रणेमार्फत घेतले जाणारे स्राव नमुने तपासणीसाठी अहमदनगरच्या जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविले जात, मात्र वाढत्या संक्रमणामुळे चाचण्यांची संख्या वाढल्याने तेथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होवून अहवाल प्रलंबित होण्याचे प्रकार सर्रास झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सरकारी यंत्रणेमार्फत घेतलेले स्राव नमुनेही खासगी प्रयोगशाळांकडून तपासणी करण्याचे आदेश देत त्यांना स्राव प्राप्त झाल्यापासून 27 तासांच्या आंत निष्कर्ष देण्याचे आदेश दिले होते. सदरचा आदेश गेल्या आठवड्याच्या शेवटी दिला गेला आहे. तेव्हापासून संगमनेरातील बहुतेक चाचण्या खासगी प्रयोगशाळेद्वारा अथवा रॅपीड अँटीजेनद्वारा केल्या जात आहेत.
त्यापूर्वी जिल्हा प्रयोगशाळेकडील प्रलंबित असलेला डाटा आता संगणकात नोंदविण्याचे काम सुरु असल्याने त्यातून अचानक एखाद्या तालुक्यात सरासरीच्या खुप पुढे जात रुग्णसंख्येचा डोंगर समोर येत आहे. मात्र त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नसून गेल्या आठ दिवसांहून अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या नोंदणीचे काम सुरु असल्याने यापुढेही जिल्ह्यातील काही तालुक्यांना रुग्णसंख्येचे धक्के बसणारच आहेत. आज संगमनेर तालुक्यातील प्रलंबित अहवालांसह गेल्या दोन दिवसांतील निष्कर्षावरुन तब्बल 617 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरी रुग्णांचे प्रमाण अत्यंल्प असून केवळ 32 जणांचा त्यात समावेश आहे. उर्वरीत सर्व अहवाल तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 449, खासगी प्रयोगशाहेचे 1 हजार 968 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 362 अशा एकूण 3 हजार 779 अहवालातून आजची रुग्णसंख्या समोर आली आहे. त्यात जिल्ह्यात सर्वाधीक 617 अहवाल एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल नेवासा 402, पारनेर 317, नगर ग्रामीण व राहाता प्रत्येकी 264, अकोले 250, शेवगाव 234, श्रीगोंदा 209, पाथर्डी 192, अहमदनगर महापालिका क्षेत्र 190, कर्जत व राहुरी प्रत्येकी 171, श्रीरामपूर 168, कोपरगाव 141, जामखेड 110, इतर जिल्ह्यातील 61, भिंगार लष्करी परिसरातील 12, लष्करी परिसरातील पाच व इतर राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.