आंबेवंगणमध्ये टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू राजूर पोलिसांत दहा जणांविरुद्ध दंगलीसह खुनाचा गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, अकोले
‘वाद मिटून घे’ म्हणाल्याचा राग आल्याने दहा जणांच्या टोळक्याने मोटारसायकलहून येत घराच्या दरवाजावर लाथा मारत घरात अचानक हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने पांडुरंग सोमा खेताडे (वय ५५, रा. आंबेवंगण, ता. अकोले) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा व पत्नी जबर जखमी झाली आहे. सदर घटना बुधवारी (ता.९) रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजूर पोलिसांनी १० जणांविरुद्ध दंगलीसह खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.

याबाबत धोंडू पांडुरंग खेताडे (वय २५, रा. आंबेवंगण) याने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, धोंडू पांडुरंग खेताडे हे आईवडीलांसह घरी असताना ओळखीचे बबलू कदम व प्रमोद घारे (दोघेही रा.मान्हेरे) व त्यांचे मित्र वैभव डगळे, वैभव गभाले, सागर भोईर, विकास गभाले, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले, विनोद शिंदे, नकुल मुंढे व इतर तीन-चार अनोळखी इसम घरी आले. त्यावेळी धोंडू खेताडे सचिन इदे यास बबलू कदम सोबतचे वाद मिटवून घे, असे म्हणाल्याच्या कारणावरून वरील दहा ते बारा जणांनी धोंडू खेताडे याच्या घरी येत घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला व आतून कडी लावून मारण्यास सुरुवात केली.

मात्र वडील पांडुरंग सोमा खेताडे मधे पडले. त्यांनाही या टोळक्याने काठ्याच्या दांडक्याने मारहाण केली. सदर मारहाण सुरू असताना ते जोरजोरात ओरडत होते. धोंडू खेताडे यांच्या आईलाही मारहाण झाल्याने तिघेही रक्तबंबाळ झाले. पांडुरंग खेताडे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने चुलता किसन सोमा खेताडे व चुलती हिराबाई किसन खेताडे हे आल्यानंतर सर्वजण पळून गेले. वडील पांडुरंग खेताडे यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ते काहीएक प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पांडुरंग खेताडे यांचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी लोणी येथे नेण्यात आला. तर जखमी धोंडू खेताडे व त्यांची आई यांच्यावर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावरुन राजूर पोलिसांनी वरील दहा आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २६१/२०२३ भारतीय दंडसंहिता कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ४५२, ३४२, ३२४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे करत आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1424484

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *