पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची श्रृंखला कायम
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे ते माळवाडी दरम्यान सोमवारी (ता.8) सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तीन अपघात झाले. या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. यामुळे महामार्गावरील अपघातांची श्रृंखला कायम असल्याचे अधोरेखित होवून ‘सोमवार’ हा अपघातवार ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकीकडे शासन अपघात रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना वाहनचालक मात्र सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचेच दिसून येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोमवारी सकाळी बोटा शिवारातील माळवाडी येथे दुभाजकावर कार आदळून कारचे मोठे नुकसान झाले होते. त्यात कारचालक हा बालंबाल बचावला. तर दुसरा अपघात डोळासणे शिवारातील बांबळेवाडी येथे झाला. महामार्गावरुन गोमांस घेवून जाणारी पिकअप समोर चाललेल्या मालवाहू ट्रकला पाठीमागून जोराची धडकल्याने पिकअप महामार्गावरच पलटी झाली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच सायंकाळी पुन्हा घारगाव शिवारात शिवशाही बसने दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला.
सोमवारी दिवसभरात तीन अपघात झाले. यावरुन महामार्गावरील अपघातांची श्रृंखला कायम असल्याचे अधोरेखित होत असून, ‘सोमवार’ हा अपघातवार ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही जुन्या महामार्गावर अपघात होतच होते. त्यानंतर महामार्गाचे चौपदरीकरण होवून अपघातांची संख्या घटेल अशी अपेक्षा होती. परंतु, वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. यामध्ये अनेक जंगली श्वापदेही अपघातांत बळी पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन शासनाच्या अपघात मुक्त प्रवास धोरणास मजबूत करावे.