कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन विविध प्रभागांतील विकास कामे करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील शंकरनगर, कर्मवीर नगर, ओम नगर, गवारे नगर, द्वारका नगरी व सह्याद्री कॉलनी येथील पथदिवे, रस्त्याचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याची पाईलाईन व गटारी भूमिगत करून मिळाव्यात. या मागण्यांसाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात राष्ट्रवादीने म्हटले आहे की, कर्मवीर नगरमधील रस्ते, पथदिवे व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे तातडीने काम करावे. औताडे घर ते पिंजारी घरापर्यंत, निकम घर ते धापटकर घरापर्यंत, सह्याद्री कॉलनी व द्वारकानगरीमध्ये पथदिवे बसवावेत. शंकर नगरमधील रस्ते, ओमनगर व शंकर नगरला जोडणारा पूल, पिण्याचे पाणी कमी येत असल्याने पाईपलाईन आठ इंची करावी, गटारी भूमिगत कराव्यात. तसेच जंगम घर ते डॉ.मेमाणे घरापर्यंत गटारीचे पाणी वाहत असल्याने तिथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच गवारे नगरमधील रस्ते, पथदिवे, पूल व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

तत्पूर्वी पालिकेला तोंडी व लेखी वारंवार सूचना देऊनही पालिका दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा आता तरी पालिकेने दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉक्टर अमरीश मेमाणे, माधुरी शिलेदार, कविता शिलेदार, सुभाष बनकर, सामाजिक कार्यकर्ते निसार शेख, कुंडलिक शिरसाठ, माधव पोटे, विलास मेहरखांब, बाळासाहेब तरवडे, योगेश उदावंत, सुहास क्षीरसागर, सुमेश हांडे, नितीन अडांगळे, वाकचौरे सर, अनिकेत बनसोडे आदिंसह नागरिकांनी केली आहे.

Visits: 250 Today: 4 Total: 1109764

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *