अखेर पोलिसांनी उलगडला विद्यार्थ्याच्या खुनाचा गुंता! पुरावा नसलेला क्लिष्ट तपास; संगमनेर-अकोले पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या अकोल्याच्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या अतिशय क्लिष्ट असलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. नाजूक कारणातून झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीतून दोघांनी त्याचा खून करुन मृतदेह नाटकी नाल्याजवळ आणून टाकल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात हाती काहीच नसतांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गेले दोन महिने मोठे परिश्रम घेत खुनाचा हा प्रकार उघड केला. पोलिसांच्या या कामगिरीने अहमदनगर पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
गेल्यावर्षी 8 डिसेंबररोजी संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह संगमनेरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या बाजूला आढळून आला होता. शवविच्छेदनातून सदरील विद्यार्थ्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र या घटनेनंतर मारेकर्यांनी मयत संकेतचा मोबाईलही नेल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला. मात्र त्यावर अडकून न बसता पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती संकलित करतांना त्याच्या मारेकर्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मयत संकेतचे नियमित पद्धतीने फोनवरुन संभाषण होत नव्हते, तो संपर्कासाठी वेगवेगळ्या संदेश माध्यमांचा (अॅप्लिकेशन्स) वापर करीत असल्याने तपास अधिक अडचणीचा बनला होता.
त्याच्या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सगळ्या शक्यता गृहीत धरुन प्रत्येक धागा तपासून बघितला. या दरम्यान जवळपास तिनशेहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेजही वारंवार तपासण्यात आले. मात्र त्यातूनही या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळू शकली नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांना नाशिकमधील एक दुवा हाती लागला आणि घटनेनंतर तब्बल महिन्याभराने खर्याअर्थी या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळाली.
घटनेच्या दिवशी (7 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मयत संकेत सुरेश नवले हा विद्यार्थी नाटकीनाल्याच्या परिसरात स्वतः गेला होता. तेथे त्याचा शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30) या दोघांशी मौखीक संवाद झाला, त्यातूनच आर्थिक देवाण-घेवाणीचा विषय समोर येवून त्यांच्यात शाब्दीक वाद झाले. या वादातून संतप्त झालेल्या त्या दोघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने घाव घालीत त्याला ठार केले व नंतर मोटार सायकलवरुन काही अंतरावर नेवून त्याचा मृतदेह नाटकीनाल्याच्या बाजूला फेकून दिला. यावेळी त्याच्या पायातील एक बूट घटनास्थळीच पडला होता, तर दुसरा बूट दुचाकीवरुन नेत असतांना रस्त्याला घासून फाटला होता.
या संपूर्ण तपासात मयताची ओळख आणि केवळ त्याचा मोबाईल क्रमांक याशिवाय पोलिसांच्या हातात काहीच नव्हते. मात्र त्या उपरांतही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पो.ना.अण्णासाहेब दातीर, अमित महाजन, पो.कॉ.सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर विभागाचे पो.ना.फुरकान शेख यांनी कमाल करीत या प्रकरणाची प्रत्येक कडी उलगडली.
या घटनेतून आजची विद्यार्थी दशेतील पिढी शिक्षणाशिवाय अन्य गोष्टींकडे भरकटल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. त्याला लहान वयातच मुलांच्या हातात आलेले मोबाईल फोन कारणीभूत असल्याचेही स्पष्ट झाले असून मोबाईलमधील वेगवेगळ्या कारणांसाठीच्या अॅप्लिकेशन्सचा वापर करुन आजचे विद्यार्थी भयंकर प्रकार करीत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासातून पोलिसांना अशा अनेक गोष्टींचाही उलगडा झाला असून आपला पाल्य मोबाईलमध्ये काय करतोय, किती वेळ घालवतोय याबाबत पालकांनी अधिक जागृत होण्याची गरजही या निमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.