पत्रकार रमेश खेमनरांनी सापडलेला आयफोन केला परत! प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक; पोलीस व मोबाइलधारकाकडून आभार

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार रमेश खेमनर यांना महागडा आयफोन मोबाइल एका विवाहात सापडला. त्यानंतर त्या मोबाइलधारकाचा शोध घेऊन मोबाइल परत करून दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे 24 एप्रिल, 2022 रोजी तमनर व बाचकर यांच्या शुभविवाहास पत्रकार रमेश खेमनर हे उपस्थित होते. विवाह सोहळा पार पडून ते पांडुरंग लॉन्समधून निघाले असता त्यांना पार्किंगमध्ये आयफोन कंपनीचा मोबाइल आढळला असता त्यांनी व त्यांचे चुलत बंधू योगेश खेमनर यांनी पांडुरंग लॉन्समधील लग्न समारंभातील उपस्थितितांना मोबाइल सापडल्याची सूचना मांडली व वधू-वराच्या कुटुंबियांना मोबाइल सापडलेल्याची कल्पना दिली व कोणाचा मोबाइल हरवलेला असल्यास ओळख पटवून घेऊन जाण्याची सूचना केली. परंतु कोणीही मुख्य मोबाइलधारक आढळुन आले नाही. त्यानंतर पत्रकार रमेश खेमनर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाइल सापडल्याची पोस्ट व्हायरल केली.

मोबाइलमध्ये सिम कार्ड नसल्यामुळे व पासवर्ड लॉक असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. कोणीही मोबाईल मालक न सापडल्यामुळे त्यानंतर सायंकाळी पोलीस ठाण्याला कॉल करून मोबाइल सापडल्याची माहिती दिली व मोबाइल हरविल्याची तक्रार आल्यास आम्हांला संपर्क करण्याचे पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. मोबाईलच्या डिसप्लेवर प्रसाद कुलकर्णी नाव व वय 18 असे आढळून आल्याने राहुरी येथे प्रसाद कुलकर्णी नामक तरुणाचा शोध घेण्यासाठी सलग दुसर्या दिवशीही पत्रकार रमेश खेमनर व त्यांचे मित्र रोहित उघडे व राजू पटारे यांनी शुक्लेश्वर येथील कुलकर्णी नामक व्यक्तींशी संपर्क करून माहिती दिली. प्रसाद कुलकर्णी नामक तरुणाचा शोध घेण्यास सुरवात केली असता गणेश मंगल कार्यालयाचे मालक यांचे प्रसाद कुलकर्णी नातेवाईक असल्याची माहिती मिळाली व ते पांडुरंग लॉन्स येथे इव्हेंट काम करण्यासाठी गेले असता त्यांचा मोबाइल हरविल्याची माहिती त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांना दिलेली होती.

परंतु रमेश खेमनर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी स्वतःहून संपर्क करून सापडलेल्या मोबाइल मालकाचा शोध घेतला व त्यांना मोबाइल आमच्याकडे असून आपणास मोबाइलची ओळख पटवून पोलीस ठाणे येथे येऊन मोबाईल घेऊन जाण्यासाठी बोलावले व त्या मोबाइलचा मालक प्रसाद कुलकर्णी, अनिल जोशी व पत्रकार रमेश खेमनर यांनी पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांच्याशी चर्चा करून मोबाइलची ओळख पटवून मोबाइल परत देण्यात आला. याबद्दल पोलिसांनी मोबाइलधारकास मोबाइल परत मिळून दिल्याबद्दल पत्रकार रमेश खेमनर व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. सध्याच्या काळात अशी प्रामाणिक लोक फार कमी मिळतात अशा प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व अनिल जोशी यांनी दिल्या.
