अकोलेतील अगस्ति महाविद्यालयाचा संगणक विभाग आगीत खाक कागदपत्रे व संगणक संचासह 62 लाख रुपयांचे नुकसान; मदतीचे आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या संगणक विभागाला मंगळवारी (ता.9) पहाटे आग लागून कागदपत्रे व संगणक संचासह 62 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेविषयी माध्यमांना माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे यांना अक्षरशः गहिवरुन आले. तर आज (ता.10) संस्थेचे कायम विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या कडेला आहे. या महाविद्यालयात अत्याधुनिक संगणक विभाग आहे. सोमवारी सायंकाळी सर्व कामकाज आटोपून शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी घरी गेले होते. त्यानंतर मंगळवारी पहाटे 4:30 ते 4:45 च्या दरम्यान संगणक विभागाला अचानक आग लागल्याचे महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती संस्थेचे सचिव व पदाधिकार्यांना दिली. माहिती मिळताच त्यांच्यासह अनेकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रुप घेतल्याने अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. बंबाने मोठ्या प्रयत्नांनी आग विझवली.
या आगीमध्ये संगणक विभागातील विद्यार्थी, शिक्षक व संस्थेची कागदपत्रे, संगणक, इलेक्ट्रिक साहित्य व फर्निचर असा 62 लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये यूपीएस 3 लाख रुपये, संगणक 30 लाख तीस हजार रुपये, हार्डवेअर 13 लाख 7 हजार रुपये, फर्निचर 7 लाख 70 हजार 700 रुपये, इलेक्ट्रीक फिटींग 3 लाख 80 हजार रुपये, सिव्हील वर्क 3 लाख 24 हजार 700 रुपये असे एकूण 61 लाख 12 हजार 400 रूपयांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. तसेच सन 2002-2003 पासूनचे आजपर्यंतचे संगणक विभागाचे विद्यापीठ व महाविद्यालयाचे सर्व निकाल, उत्तरपत्रिका, जनरल प्रकल्प, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शैक्षणिक साहित्यही आगीत खाक झाले आहे.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच संस्थेचे विश्वस्त सीताराम गायकर यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेेेेतली. तर संस्थेचे कायम विश्वस्त तथा माजी मंंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड मुंबईत असल्याने त्यानी फोनवर संपर्क करुन माहिती घेत सूचना केल्या. तसेच घटनेची माहिती शहरात पसरताच संस्थेचे सर्व विश्वस्त, व्यापारी, अनेक माजी विद्यार्थी व संस्थेवर प्रेम करणार्या अनेक नागरिकांनी महाविद्यालयात येवून चौकशी केली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य भास्कर शेळके, भाऊसाहेब गोडसे, एस. पी. देशमुख, संचालक रमेश देशमुख, आरिफ तांबोळी, कल्पना सुरपुरीया, राहुल बेनके, धनंजय संत, एस. पी. मालुंजकर, संगणक विभागाचे गुंजाळ यांसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या घटनेविषयी माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष आंबरे यांना बोलताना गहिवरून आले. संस्थेच्या इतिहासात प्रथमच इतकी दुर्दैवी घटना घडली आहे. संस्था लवकरच कमीत कमी दिवसांत हा संगणक विभाग उभारणार आहे. या अपघाताचे विम्याचे पैसेही मिळतील. पण त्याला उशिर लागेल अशी भावना व्यक्त करुन तालुक्यातील दानशूर व्यक्ती, व्यापारी व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही संस्थेने केले आहे.