साकूर परिसरातील रुग्णांना आता तत्काळ मिळणार रुग्णवाहिका!

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर परिसरातील रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. ही गरज ओळखून मुळा खोरे ग्रामीण पतसंस्था व ओएसआर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.4) साकूर ग्रामपंचायतीमध्ये लोकार्पण करण्यात आले. यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

रुग्णवाहिका लोकार्पण करतेवेळी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर आणि ग्रामपंचायत पदाधिकार्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यापूर्वी साकूर परिसरात रुग्णवाहिका नसल्याने घारगाव किंवा चंदनापुरी येथील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागत होते. यामुळे अधिक वेळ जावून रुग्णांचे हाल होत होते. ही महत्त्वाची गरज ओळखून मुळा खोरे पतसंस्था व ओएसआर फाउंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या सामाजिक दायित्वाबद्दल पतसंस्था व फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
