संगमनेरात आजही सापडले एक्केचाळीस रुग्ण! शनिवारचा आठवडे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात सुरू झालेले कोविडचे संक्रमण अजूनही भरातच असून दररोज मोठ्या संख्येने बाधितांची भर पडतच आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शहर आणि तालुक्यातील रुग्णगतीत जणू स्पर्धा लागल्याचेच चित्र आहे. त्यातच अजून चाचण्यांना म्हणावा तसा वेग नसल्याने समोर येणारी रुग्णसंख्या वास्तवापेक्षा कमी असण्याचीही दाट शक्यता आहे. यावेळी सुरु झालेल्या संक्रमणात आरोग्य यंत्रणांना प्रदीर्घ अनुभव असतांनाही सुरुवातीलाच काही मृत्यू झाल्याने त्याची दाहकताही गांभिर्याने घेण्याची गरज आहे. बाधितांच्या संख्येत दररोत मोठी भर पडण्याच्या श्रृंखलेत आज शहरातील तेरा जणांसह एकूण एक्केचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत भर पडून ती आता 7 हजार 72 झाली आहे. त्यातील सक्रीय संक्रमितांची संख्या केवळ 287 आहे.
लग्नांच्या मोसमास माघारी परतलेल्या कोविडच्या विषाणूंनी तालुक्याच्या चौफेर पाय पसरले आहेत. त्यामागे यापूर्वीच्या प्रादुर्भावात आपल्या गावातील लोकांशी प्रसंगी वैरत्त्व घेवून नियमांची अंमलबजावणी करणार्या ग्रामसुरक्षा समित्या यावेळच्या लाटेत मात्र दडपणात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणभागात अजूनही धुमधडाक्यात आणि शेकडोंच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. आजही तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या गर्दीचे लग्न सोहळे पार पडल्याची माहिती आहे. मात्र त्या गावच्या स्थानिक ग्रामसुरक्षा समित्या, कामगार पोलीस पाटील यांनी त्यांकडे सपशेल कानाडोळा केल्यानेच ते घडल्याचेही त्यातून अगदी स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोविडचे काम सोपे झाले असून रुग्णांची संख्याही वाढत आहे.
खरेतर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गर्दीतून हा विषाणू झपाट्याने पसरू शकतो, त्यामुळेच शासनाने गर्दी होणारी ठिकाणं बंद केली आहेत. दर शनिवारी संगमनेरात मोठा बाजार भरतो. जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार अशी येथील शनिवारची ओळख आहे. हे अद्याप वीज मंडळाला उमगलेले नाही ते वेगळे. असे असतांनाही उद्याच्या (ता.6) संगमनेर आठवडे बाजाराला मनाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्या संगमनेरात मोठी गर्दी दिसणार असून प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी म्हणून मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे अन्यथा जायबंदी होवूनच घरी परतावे लागेल अशी दाट शक्यता आहे.
आज (ता.5) प्राप्त शासकीय प्रयोगशाळेकडून 18, खासगी प्रयोगशाळेकडून 22 तर रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा एक असे एकूण 41 जणांचे अहवाल संक्रमित प्राप्त झाले. त्यात शहरातील तेरा जणांचा समावेश आहे. चैतन्य नगर येथील 68 वर्षीय महिला, विद्यानगर मधील 71 वर्षीय ज्येष्ठ, देवाचा मळा येथील 45 वर्षीय इसम, मेनरोडवरील 55 वर्षीय महिला, शिवाजीनगर मधील 74 वर्षीय महिला, जनता नगरमधील 40 वर्षीय तरुण, घरकूल सोसायटीतील 26 वर्षीय तरुण, शहर पोलीस ठाण्याजवळच्या परिसरातील 72 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 50 वर्षीय महिला, जानकीनगरमधील 48 वर्षीय इसम आणि केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 52 व 48 वर्षीय इसमांसह 15 वर्षीय मुलाला कोविडची लागण झाली आहे.
ग्रामीणभागातील रुग्णवाढीची श्रृंखला आजही कायम असून आज रणखांब येथील 62 वर्षीय महिला, निमोण येथील 25 वर्षीय तरुणासह 17 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 30 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथील 50 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 42 वर्षीय महिला आणि 41 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर येथील 55 वर्षीय इसम, वनकुटे येथील 74 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 55 वर्षीय इसमासह 51 व 22 वर्षीय महिला, घारगाव येथील 74 वर्षीय महिला व 70 वर्षीय इसम, आंबी दुमाला येथील 31 वर्षीय तरुण, राजापूर येथील 56 वर्षीय इसम,
चंदनापुरी येथील 48 वर्षीय इसमासह 47 व 45 वर्षीय दोन महिला, रायतेवाडी येथील 36 वर्षीय महिला, खांडगाव येथील 26 वर्षीय महिला, निमज येथील 23 वर्षीय महिला, जार्वे येथील सात वर्षीय बालक, बांबलेवाडी येथील 29 वर्षीय तरुण, हिवरगाव पठार येथील 44 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 34 वर्षीय महिला अशा एकूण 41 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे चालू महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येत आणखी भर पडून रुग्णसंख्या आता 7 हजार 72 वर पोहोचली आहे.
नियम झुगारुन साजरे झालेले विवाह सोहळे साजरे झाल्याने संगमनेर तालुक्यात कोविडचे दुसरे संक्रमण सुरू झाले. याबाबत वारंवार चर्चा, बातम्या व प्रसिद्धी होवूनही आणि तालुक्याची रुग्णसंख्या दररोज वाढत असतांनाही असंवेदनशीलतेतून साजर्या होणार्या अशा सोहळ्यांमध्ये कोठेही कमी झाल्याचे वृत्त नाही. आजही तालुक्याच्या आडवळणांना झालेल्या काही लग्न सोहळ्यांना शेकडो पाहुण्यांची उपस्थिती होती.