बोगस कांदा बियाणे विकणार्यांवर कारवाई करा ः पानसरे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून कांदा पीक ओळखले जाते. मात्र या हंगामामध्ये कांद्याचे हजारो किलो बी उत्पादक कंपन्या व संबंधित दुकानदारांनी खोटे विकले आहेत. यामुळे शेतकर्यांची मोठी फसवणूक झाली असून, अशा बोगस बी कंपन्या व संबंधित दुकानदारांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी घुलेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भास्कर पानसरे यांनी केली आहे.
कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकर्यांनी यावर्षी कांदा उत्पादन घेण्याचे ठरविले. मात्र शेतकर्यांची मागणी पाहून अनेक बीज कंपन्या व दुकानदारांनी बनावट बी शेतकर्यांना विकले. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकर्यांची मोठी फसवणूक झाली आहे. महागड्या किंमतीचे बी घेऊन हे बी पेरले. मात्र सर्व बी हे बोगस असल्याने त्याची उगवण झाली नाही. जेथे उगवले त्या पिकास डोंगळे निघाले. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबाबत वेळोवेळी पंचायत समिती, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांनी अतिशय बेजबाबदार उत्तरे देत शेतकर्यांनी ग्राहक मंचाकडे जावे असे मोफत सल्ले दिले आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. म्हणून सर्व बोगस बी कंपन्या व विक्रेते दुकानदार यांच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेची आहे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी भास्कर पानसरे यांनी दिला आहे.