देवळाली प्रवरात यूरिया खत खरेदीसाठी शेतकर्यांची तोबा गर्दी आधी सभासदांनाच वाटप करण्याची मागणी; काळाबाजारही सुरू

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे यूरिया खत आल्याचे समजताच महिला व पुरुष शेतकर्यांनी खत घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकर्यांनी मका, कपाशी, सोयाबीन, आदी पिकांची पेरणी केली आहे. या पिकांसाठी सध्या यूरिया खताची आवश्यकता आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बाजारात यूरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नुकतेच देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये 40 टन व एका कृषी सेवा केंद्रामध्ये 15 टन यूरिया आल्याचे समजताच शेतकर्यांच्या खत घेण्यासाठी रांगा लागल्या.

यापूर्वी बागायत पीक सोसायटीमध्ये 20 टन यूरिया खत आले होते. याठिकाणी देखील यूरिया घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक शेतकर्याला दोन गोण्या मिळत असल्याने नंबर लावण्यासाठी व जास्त गोण्या मिळण्यासाठी कुटुंबातील महिला सदस्यांनाही सोबत आणले होते. दोघे रांगेत असल्याने दोघांनाही खत मिळत होते. खत घेण्यासाठी स्थानिकांपेक्षा गावाबाहेरील चिंचविहिरे, कणगर, ताहराबाद, वरशिंदे, लाख, जातप, त्रिंबकपूर, टाकळीमियाँ, गुहासह आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे संस्थेच्या सभासदांवर अन्याय होत असून आधी सभासदांना वाटप करण्यात यावे, नंतर बाहेरगावच्या लोकांना वाटप करावे अशी तक्रार सभासदांनी केली आहे.

दरम्यान, नॅनो यूरिया देखील लवकरच बाजारात येणार आहे. यामुळे यूरियाचा तुटवडा संपणार आहे. हा यूरिया द्रव स्वरुपात असून एक लिटरच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. याची किंमत 240 रुपये असून एकरी एक लिटर फवारणीची मात्रा देण्यात आली आहे. ऐन पावसाळ्यात यूरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच काळाबाजारही सुरू झाला आहे. शेतकर्यांच्या नावाखाली काही महाभाग रांगेत उभे राहून खत घेत आहेत व चढ्या भावाने बाहेर विकत आहेत. याला आळा बसण्यासाठी आधारकार्ड सोबत सात-बारा उतारा असल्याशिवाय संबंधितांना खते देऊ नयेत, तसेच सभासदांना पहिले प्राधान्य द्यावे, अशी मागणी संस्थेचे सभासद व स्थानिकांनी केली आहे.
