वाळू तस्करीला पाठबळ देणार्यांवर कारवाईसाठी ‘आत्मदहन’! घारगावच्या सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा; अन्यथा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाळू तस्करी आणि संगमनेर हे सूत्र किती घट्ट रुजले आहे हे स्पष्ट करणारी मोठी घटना पठारभागातील घारगावमधून समोर आली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कडवे पाईक गणेश धात्रक यांनी या घटनेकडे जिल्ह्याचे पालक राजेंद्र भोसले यांचे लक्ष्य वेधले असून मागील मोठ्या कालावधीपासून सुरू असलेली गौण खनिजाची लुट त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतच त्यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रातून येथील वाळू तस्करीविरोधात अनेकवेळा तक्रारी करुनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता कर्तव्यात दिरंगाई करुन वाळू तस्करीला प्रोत्साहन देणार्या अधिकार्यांपासून कोतवालापर्यंत सर्वांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या तीन दिवसांत त्यांच्या तक्रारीचा निपटारा न झाल्यास सोमवारी (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

गेल्या दशकभरात संगमनेर तालुक्यातून वाहणार्या मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी व कस या नद्यांच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरु झाला. सुरुवातीला या बेकायदा व्यवसायावर ठराविक वाळू तस्करांची मक्तेदारी होती, मात्र नंतरच्या काळात यात राजकीय हस्तकांचाही शिरकाव झाल्याने अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत या सगळ्याच नद्यांच्या पात्रात ओसंडून भरलेली वाळू आज 20 ते 50 फूटांपर्यंत खोली गेली आहे. निसर्गाच्या जलचक्रावरील या घाताचे दुष्परिणाम काही दशकांनंतर समोर येणार असल्याने आज अनेकांना त्याचे फारसे गांभीर्य वाटत नाही. मात्र हाच अमर्याद वाळू उपसा भविष्यात काठावरील हजारो, शेकडो एकर जमिनींना उध्वस्त करणारा ठरणार आहे.

बेकायदेशीरपणे सुरू असलेला हा प्रकार रोखण्याची जबाबदारी महसूल व पोलीस प्रशासनाची आहे. मात्र या दोन्ही खात्यातील काही अधिकारी व कोतवालापर्यंतच्या श्रेणीतील कर्मचारी वाळू तस्करांशी आर्थिक संधाण बांधून घेत असल्याने सामान्य माणसं, पर्यावरण प्रेमी या अवैध प्रकारांबाबत जीव ओतून बोंबलूनही त्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही. संगमनेरातील वाळू तस्करीचे तो क्या कहने. अगदी येथून 97 किलोमीटर लांब असलेल्या अहमदनगरमधील एल.सी.बी.पासून (स्थानिक गुन्हे शाखा) ते व्हाया श्रीरामपूर नवीन नगररोडने शहर, तालुका, घारगाव आधि आश्वी या चारही पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी अगदी खूश आहेत. हा धंदा असाच जोमात चालावा आणि त्याचे ओघळ त्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी ही संपूर्ण साखळी त्यांना हवी ती मदत करायला अगदी तत्पर असते. त्यामुळे सामान्य माणसांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्यच, त्यात तक्रार म्हंटल्यावर तर त्याचा दुरुनही संबंध येणार नाही अशी अवस्था आहे.

तालुक्याच्या पठारभागातून वाहणारी मुळानदी तर वाळू तस्करांना लग्नात आंदण दिल्यासारखीच आहे. मुळा नदीच्या पात्रात जेथून कोठून उतरायला जागा आहे तेथून आणि जेथून नाही तेथे निर्माण करुन अहोरात्र बेसुमार वाळू तस्करी सुरु आहे. एका अंदाजानुसार एका रात्रीत मुळेच्या पात्रातून तब्बल 22 ते 25 ढंपर वाळू उपसली जाते. एक ढंपर वाळूची सरासरी किंमत 25 ते 35 हजारांपर्यंत असते. याशिवाय ट्रॅक्टर, पिकअप जीप याद्वारे होणारा वाळू उपसा वेगळाच असतो. हा धंदा कारवाईशिवाय सुरु राहू देण्यासाठी मोठ्या प्रमाणाच लाच दिली जाते. त्याचा आकडा 5 हजारांपासून 50 हजार एका ढंपरला असा असू शकतो. यावरुन दर महिन्याला महसूल व पोलीस विभागातील काही अधिकारी व काही कर्मचार्यांना मिळणार्या पैशांचा सहज अंदाज बांधता येईल.

ज्या नदीला जीवनदायी समजले जाते, त्या नदीचे दररोज डोळ्यादेख लचके तुटत असताना अनेकांना असह्य होतं. काहीजण यंत्रणा सक्षम असलेला भाव ठेवून कारवाईच्या अपेक्षेने तक्रारी करतात, मात्र बरबटलेल्या हातांकडून त्यांचा भ्रमनिरास होतो आणि मग त्याचा कायदा आणि यंत्रणा या दोन्हींवरील विश्वास कमकुवत होत जातो. असाच अनुभव घारगावच्या गणेश धात्रक यांनी घेतला आहे. मुळा नदीपात्रालगतच्या नांदूर खंदरमाळ, खैरदरा, येठेवाडी व लहूचा मळा या भागातून अहोरात्र सुरू असलेला वाळू उपसा थांबवावा यासाठी त्यांनी वारंवार महसूल खात्याकडे तक्रारी केल्या, मात्र वरीलप्रमाणे भ्रष्टाराचात तृप्त झालेले हात कारवाई करण्याच्या नावाने मात्र थरथरल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. गेल्या चार-सहा महिन्यांत झालेल्या या तक्रारींनंतर याच भागातून एक धक्कादायक प्रकारही समोर आला होता.

नदीपात्रात पाणी असतानाही आपला बेकायदा उद्योग बंद होवू नये यासाठी तस्करांनी नदीपात्रात भराव टाकून चक्क सेतू तयार केला होता. माध्यमांमधील बातम्यांनंतर लाजलेल्या महसूल प्रशासनाने हा सेतू काढण्याचा ‘शो’ केला, मात्र सेतूचे अस्तित्त्व मात्र संपले नाही. आजही त्याचा वापर वेसुमार वाळू उपशासाठी केला जात आहे. मध्यंतरी नाशिक व अहमदनगरच्या भरारी पथकांनीही मुळानदीच्या पात्रात धाडी घालून काही कारवाया केल्या होत्या. तेव्हा जप्त केलेला वाहनांमधील वाळू साठाही आता ‘चोरीस’ गेलेला आहे, अर्थात तशी तक्रार मात्र नोंदविण्यात आलेली नाही. यावरुनही महसूलचे आणि वाळू तस्करांचे प्रमाचे संबंध सहज लक्षात येईल.

धात्रक यांनी या सर्व गोष्टी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या आपल्या पत्रातून सांगितल्या आहेत. वेळोवेळी त्यांनी लेखी स्वरुपात, ऑनलाईन पाठविलेल्या तक्रारींचे दाखलेही त्यांच्या समोर ठेवण्याची व पठारभागातील वाळू तस्करीची संपूर्ण माहिती देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली असून आपल्या या तक्रार अर्जाची जिल्हाधिकार्यांनी दखल घेवून कर्तव्यात कसूर करणार्या, पैशांच्या लालसेने वाळू तस्करांना पाठबळ देणार्या अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी होवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पुढील तीन दिवसांत जिल्हाधिकार्यांनी कारवाई न केल्यास 27 जून रोजी (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या तक्रार अर्जाच्या प्रती त्यांनी विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक व तहसीलदारांना पाठविल्या आहेत.

गणेश धात्रक हे कधीकाळी शिवसेनेची पठारभागातील बुलंद तोफ समजले जायचे. अगदी विद्यार्थीदशेत असताना त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष या पदावर काम करताना विद्यार्थ्यांची चळवळ उभी करुन आपल्यातील प्रतिभा ठळक केली होती. सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरीत झालेल्या धात्रकांचे ज्येष्ठ सेना नेते विलास भानुशाली यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. विद्यार्थी सेनेच्या रोजगार हमी योजना विभागाचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी ठळक काम केले आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती, तेव्हापासून ते बिछान्यावरच होते. मात्र या कालावधीतही त्यांनी आपला लढवय्या बाणा सोडला नाही. मुळेतील वाळू तस्करी विरोधात प्रशासकीय पातळीवर सुरू झालेला त्यांचा हा संघर्ष हेच सांगणारा आहे.
