महसूल व ग्रामपंचायतीच्यावतीने चांदेकसारेत अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण

महसूल व ग्रामपंचायतीच्यावतीने चांदेकसारेत अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण
कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशींनी घेतली तात्काळ दखल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चांदेकसारे परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत ग्रामपंचायतीला संपूर्ण बाधित कुटुंबांचा पंचनामा करण्याची सूचना केली. त्यानंतर महसूल व ग्रामपंचायतीच्यावतीने अवघ्या आठ तासांत गावातील जवळपास 50 बाधित कुटुंबांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले.


माजी सरपंच केशव होन यांनी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमजूर व कष्टकरी कुटुंबांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे गट विकास अधिकारी सूर्यवंशी यांच्या लक्षात आणून दिले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही महसूल विभाग व कृषी विभागाला चांदेकसारे पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे व घरात शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली. तद्नंतर लगेचच पंचनामे करण्यास सुरुवात झाली.


यावेळी विस्ताराधिकारी बी.टी.वाघमोडे, सरपंच पूनम खरात, अर्जुन होन, तलाठी दत्तात्रय बिन्नर, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर, सचिन आभाळे, मलू होन आदी उपस्थित होते. तलाठी बिन्नर व ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेत बाधित कुटुंबांचे पंचनामे करून घेतले. चांदेकसारे पंचक्रोशीतील सोनेवाडी, डाऊच खुर्द, घारी आदी परिसरात अतिवृष्टीने सोयाबीन व मका पिकांमध्ये पाणीच पाणी झाले असून सदर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचेही नुकसानीचे पंचनामे व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Visits: 120 Today: 1 Total: 1106144

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *