श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून विधानसभेची मतपेरणी! एका अधिकार्‍याकडून राममूर्तीचे वितरण; आवरणावर ‘मोदी-फडणवीसां’ची छायाचित्रे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाच्या एकूण वातावरणावर परिणाम करणारा ठरला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळण्यासह उत्तरप्रदेशचा धार्मिक पर्यटनक्षेत्र म्हणून विकास साधण्याचा प्रयत्न दिसत असला तरीही त्यातून बहुसंख्य हिंदू मतदारांना एका सूत्रात बांधण्यात आणि त्याचा राजकीय लाभ घेण्यात भाजप कमालीची यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. या प्रवाहात अनेक इच्छुकांनीही बाजी मारली असून पुण्यातील जीवन प्राधिकरणात कार्यरत असलेल्या एका वरीष्ठ अधिकार्‍याने तर संपूर्ण तालुक्यात तब्बल चाळीस हजार श्रीराममूर्तींचे वितरण करुन विधानसभेचे रणशंखच फुंकल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारी सेवेत असलेल्या या महोदयांनी वाटप केलेल्या मूर्तींच्या आवरणावर मोदी-फडणवीस यांच्या छायाचित्रांसह ‘दाही दिशांतून घुमते नाम, जय श्रीराम जय श्रीराम..’ असा संदेशही दिला आहे. त्यावरुन त्यांची ही रामभक्ती विधानसभा निवडणुकीच्या दिशेने जात असल्याची जोरदार चर्चा सध्या संगमनेर तालुक्यात सुरु आहे.

गेल्या सोमवारी (ता.२२) अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी जवळपास पंधरा दिवसांपासूनच भाजपसह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी देशभरातील वातावरण राममय करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रक्रियेतून नव्याने उभे राहिलेले श्रीराम मंदिर भाजपमुळेच शक्य झाल्याचा संदेश देण्यासोबतच बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्या मतपेढीत परावर्तीत करुन त्याचा निवडणुकीत लाभ घेण्याची योजनाही राबविली गेली आणि त्यात भाजपाला यश मिळतानाही दिसत आहे.

एकीकडे पक्षीय पातळीवर सुरुवातीपासूनच भाजपाने श्रीराम मंदिराचे श्रेय ओढून घेतल्याने दुसरीकडे पक्षात असलेले अथवा नव्याने दाखल होवून उमेदवारी पदरात पाडून घेणारेही पुढे सरसावल्याचे दिसून आले. त्यात पूर्वाश्रमीचे संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असलेले व सध्या पुण्याच्या जीवन प्राधिकरणाचे वरीष्ठ असलेले एक मोठे अधिकारी आघाडीवर असल्याचे बघायला मिळाले. श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधून त्यांनी फडणवीस सरकारने कार्यान्वित केलेल्या अनुलोमच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात जवळपास ४० हजार श्रीरामांच्या पितळी मूर्तीचे वितरण केले.

शहर व आसपासच्या गावांमध्ये घराघरात पोहोचलेल्या या मूर्तीं छोट्याशा बॉक्समध्ये पॅकिंग करुन देण्यात आल्या आहेत. त्याच्या बाह्य आवरणावर दोन्ही बाजूला ‘मोदी-फडणवीस’ यांची छायाचित्रे असून त्यामध्ये ‘दाही दिशांतून घुमते नाम, जय श्रीराम जय श्रीराम..’ असा संदेशही देण्यात आला आहे. आतील बाजूस बॉक्सच्या झाकणावरच मूर्ती सौजन्य म्हणून रामभक्त असा उल्लेख करीत संबंधित अधिकार्‍याचे नावही छापण्यात आले आहे. या सर्व घटनाक्रमावरुन संबंधित अधिकारी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही ठळकपणे समोर आले आहे.

संबंधित अधिकार्‍याने यापूर्वी २०१४ आणि २०१९ अशा दोन्हीवेळा संगमनेर विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्हीवेळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिवसेनेचे मतभेद उघडपणे समोर आल्याने त्यांनी माघार घेतली. मात्र यावेळी देशात राममय वातावरण तयार झालेले आहे. याचा भाजपला फायदा होण्यासह एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेचीही ताकद मिळणार असल्याने ‘त्या’ अधिकार्‍याने श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधून श्रीरामांच्या मूर्तीतून मतपेरणीला सुरुवात केल्याचे दिसून आले.

खरेतर शासकीय सेवेत असलेली व्यक्ती धर्मनिरपेक्ष असायला हवी असा दंडक आहे. या अधिकार्‍याने मात्र त्या नियमालाच तिलांजली वाहून एका समाजाचे धार्मिक प्रतीक असलेल्या श्रीरामांच्या मूर्ती वाटण्यासह ‘मोदी-फडणवीस’ यांच्या छायाचित्रांचाही वापर केला आहे. हा प्रकार सेवाशर्थींचे उल्लंघन करणारा ठरु शकत असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची किती गांभीर्याने दखल घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *