कोपरगावच्या नगराध्यक्षांना विरोधकांचे पत्रकार परिषदेतून उत्तर! नगरसेवकांसह पक्षीय पदाधिकार्यांनी विविध विषयांवरुन डागली तोफ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
विषय भिन्न दिशेला नेण्यासाठी सध्या बेछूट आरोप चालू आहेत. आम्ही जी मालमत्ता घेतो ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतो. सरकारची संपत्ती घेत नाही. विशेषतः महाराजांच्या नावावर ‘ड्रॉ’ काढून घेत नाही. त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षांनी खरेदी-विक्री व्यवसायात यावे, त्यांचे आम्ही स्वागतच करु. 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा हिशोब सांगितला तर तुम्हांला शहरात फिरणेही मुश्कील होईल. हिशोबाचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ या सर्व दाखवू असे आव्हान अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले आहे.

काही दिवसांपूर्वी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन कोल्हे गट व शिवसेना नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला होता. याला उत्तर देण्यासाठी सोमवारी (ता.1) लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले, माझ्यावर पाणी पुरवठ्याचे पैसे खाल्ल्याचे आरोप केले ते खोटे आहेत. सभेत 42 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा विषय घ्यावा म्हणून मी अनेकदा पत्र दिले. उलट ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम नगराध्यक्ष वहाडणे यांनीच केले. मी विरोध करतो म्हणून मला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. काहीही केले तरी मी शांत बसणार नाही. कधी नव्हे एव्हढी राजकारणाची पातळी खाली गेली आहे. आपली जागा विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिली आहे. सर्व कामांचा मलिदा गेल्याने बेछूट आरोप सुरू आहेत असा घणाघात निखाडे यांनी केला.

तर नगरसेवक योगेश बागुल यांनीही नगराध्यक्ष वहाडणेंवर हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचा वास येत असल्याने आम्ही सर्व विषय नामंजूर केले. भ्रष्टाचाराला विरोध करणारच, कारण त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आमचे संस्कार काढणार्यांनी आधी आपले संस्कार कोणते आहे ते सांगावे. विकासकामांना विरोध नाही. मात्र कामात गफलत असेल तर बहुमताचा हिसका दाखवणार असा इशारा दिला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी मी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही, ती जागा संघटनेकडून विकत घेतली आहे असे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी चारही पाणी पुरवठा योजना माझ्याच काळात झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या काळात काय केले ते सांगा आणि राहिलेले सहा महिने चांगले काढा असा उपरोधिक टोला लगावला.

भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले, येवला रस्ता येथे पन्नालाल गुजराथी यांची जागा आहे, तिच्यावरील आरक्षण उठविण्यासाठी नगराध्यक्ष खोटे आरोप करीत आहेत. आम्ही सर्व नगरसेवकांनी विजय कट्रक्शनला पैसे देऊ नका असा ठराव करुनही नगराध्यक्षांनी तीन कोटी रुपये दिले असे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी सांगितले. नगरसेवकांत भांडणे लावायचे थांबवावे. तुमच्या कोणत्याही गोष्टीला आम्ही भीक घालणार नाही. लवकरच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे टोलाही शेवटी लोकप्रतिनिधींनी लगावला. या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, रवींद्र पाठक, विजय वाजे, कैलास जाधव, नयनकुमार वाणी, गटनेते योगेश बागुल, शिवाजी खांडेकर, जनार्दन कदम, अल्ताफ कुरेशी, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
