संगमनेरात ‘त्या’ वृत्तपत्राच्या अंकाची होळी! गरब्याच्या छायाचित्रावरुन संताप; सकल हिंदू समाज आक्रमक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरात्रोत्सवातील गरब्याच्या वृत्तांकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका छायाचित्रावरुन राज्यभरात वादाची ठिणगी पडली असतानाच संगमनेरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पुण्यातून प्रसिद्ध होणार्या एका दैनिकाच्या गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या कथित वादग्रस्त छायाचित्राच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी शास्त्री चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत संबंधित वृत्तपत्राच्या अंकाची होळी केली. अशा प्रकारच्या छायाचित्रांना आणि बातम्यांना प्रसिद्धी देऊन विशिष्ट प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पुन्हा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

सध्या नवरात्रोत्सव सुरु असून शहरांसह ग्रामीण भागातही गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांची धूम सुरु आहे. या उत्सवातील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष टिपणार्या छायाचित्रांसह विविध वृत्तपत्रांतून वृत्तांकन केले जात आहे. मात्र, पुण्यातून प्रसिद्ध होणार्या एका आघाडीच्या दैनिकाने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या गरब्याच्या काल्पनिक छायाचित्रावरुन वाद निर्माण झाला आहे. संबंधित छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने तयार करण्यात आले असून, त्यात वेगवेगळ्या समुदायांतील तरुण-तरुणी एकत्र गरबा खेळताना दाखवण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे.

या छायाचित्राच्या माध्यमातून कथितरीत्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत संबंधित दैनिकाच्या संपादकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच संबंधित संपादकांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी विविध ठिकाणी आंदोलनातून होत आहे.

संगमनेरातही या प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री चौकात एकत्र येत संबंधित वृत्तपत्राच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर वादग्रस्त वृत्ताच्या निषेधार्थ वृत्तपत्राच्या अंकाची होळी करण्यात आली. प्रसिद्धीपत्रकाद्वारेही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, धार्मिक भावना दुखावणारे आणि कथितरीत्या जिहादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे चित्रण पुन्हा प्रसिद्ध करु नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या इशार्यानुसार, संबंधित वृत्तपत्राने अशा प्रकारची छायाचित्रे आणि बातम्या यापुढे प्रसिद्ध करु नयेत. अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या वेळी हर्षल जेधे, गौतम जेधे, ललित परदेशी, ओमकार अभंग, पूजा चव्हाण, रेखा गलांडे, भाविक गायकवाड, अभी शेरमाळे, तेजस संसारे, प्रसाद शेरमाळे, तनेश जेधे, अर्जुन जेधे, सार्थक शेरमाळे, शंभू तारे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

