नातेवाईकांच्या कारावासाला कारणीभूत असल्याच्या संशयावरुन मारहाण! वाहनचालकाची गळफास घेत आत्महत्या; दहाजणांवर प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसरात्र डोळ्यांचे पडदे फाडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या वाहनचालकामुळेच आपले दोघे नातेवाईक कारागृहात असल्याचा आरोप करीत दहाजणांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी दोघांच्याही सुटकेनंतर आम्ही तुला व तुझ्या कुटुंबाला संपवल्याशिवाय राहणार नसल्याची धमकीही भरल्याने आपल्या लेकरांच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या सोपान चव्हाण या सामान्य वाहनचालकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी संगमनेरात घडला. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन अकोलेनाका परिसरात राहणार्‍या दहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून केवळ संशयातून एकाचा बळी गेल्याने हळहळही व्यक्त केली जात आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या प्रकरणाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली होती. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी अकोलेनाका परिसरातील भराडवस्तीत एकमेकांच्या आसपास राहतात. दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यंतरी वाद झाले होते. त्यावेळी आरोपींचे दोघे नातेवाईक रोहीत भिका चव्हाण व अक्षय दादा चव्हाण चोरीच्या प्रकरणात कारागृहात असल्याचा उल्लेख करीत त्याला संबंधित वाहनचालकच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तेव्हापासून दोन्ही कुटुंबातून विस्तूही जात नव्हता. मात्र आरोपी दररोज रस्त्याने जातायेता फिर्यादीच्या घराकडे पाहून शिवीगाळ व दमदाटीही करीत असतं.


व्यावसायिक वाहनावर चालकाचे काम असल्याने सोपान उत्तम चव्हाण एकदा वाहनावर गेल्यानंतर अनेक दिवस घराबाहेर राहत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी दोन मुलं, सुन व दोन नाती असा त्यांचा संसार सुखाने चालू होता. मात्र एखाद्या कष्टकर्‍याच्या हसर्‍या संसाराला नजर लागावी त्याप्रमाणे मंगळवारी (ता.13) त्यांच्या घरावर अरिष्ट येवून कोसळलं. आदल्या दिवशीच सोमवारी सायंकाळीच घरी परतलेले सोपान चव्हाण मंगळवारी सकाळी आपल्या नातीशी खेळत असतानाच वकिल नाना चव्हाण व त्याची पत्नी पार्वताबाई आपली मुलं, सुना आणि अन्य नातेवाईकांचा जमाव घेवून त्यांच्या घरात घुसले आणि आमच्या दोघा नातेवाईकांना तुझ्यामुळेच जेलमध्ये जावे लागले असा थेट आरोप करीत त्यांना लाथाबुक्क्यांसह काठ्यांनी बेदम मारहाण सुरु केली.


यावेळी त्यांची छोटी नातं मोठमोठ्याने रडतं असूनही दहाजणांच्या जमावात चार महिला असताना एकीलाही पाझर फूटला नाही. यावेळी वकिल चव्हाण आणि त्याच्या नातेवाईकांनी ‘अटकेत असलेले दोघे सुटून आले की तुला आम्ही संपूवन टाकू..’ अशी धमकी भरताच त्यातील चौघे हातात काठ्या घेत ‘आता तुला जिवंतच सोडीत नाही..’ असे म्हणतं त्यांच्यावर धावल्याने जीवाच्या आकांताने त्यांनी अर्धमेल्या अवस्थेतही तेथून पळ काढल्याने मारेकर्‍यांच्या हल्ल्यातून त्यांची सुटका झाली. माध्यान्नाच्या सुमारास त्यांनी घडल्याप्रकाराबाबत त्यांच्या पत्नीला फोनवरुन सविस्तर माहिती देत घडलेला घटनाक्रम आणि मारहाण करणार्‍यांची व धमकी देणार्‍यांची नावेही सांगितली. पतीवर कोसळलेल्या या संकटाने हादरलेली ती माऊली प्रपंचाला हातभार म्हणून मोलमजुरीसाठी शहरापासून लांब गेलेली असताना धावतपळत घराकडे परतली.


दिवसभर अस्वस्थ असलेल्या सोपान चव्हाण यांनी रात्री आपल्या मनातील भीती ओठांवर आणून वकिल नाना चव्हाण व त्याच्या कुटुंबापासून जीवाला धोका असल्याचे पत्नीला सांगितले. त्यांची समजूत काढून रात्रभर एकमेकांना धीर देत दोघेही झापी गेले. बुधवारी (ता.14) सकाळी सोपान चव्हाण यांची पत्नी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडली, त्यावेळी तिचे पती घरात एकटेच होते. माध्यान्नाच्या सुमारास त्यांना त्यांच्या पतीच्या फोनवरुनच नातीने फोन करुन तिचे आजोबा सोपान चव्हाण यांनी अकोलेनाक्यावरील चाँदशहावली बाबाच्या दर्ग्याजवळ झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास बांधून आत्महत्या केल्याचे सांगितले. या बातमीने आभाळ फाटलेली ती माऊली धावतपळतच घटनास्थळी पोहोचली आणि वरील घटनाक्रमाला वाचा फुटून त्यात एकाचा नाहक बळी गेल्याचे भयानक वास्तव समोर आले.


या प्रकरणी मयताच्या पत्नीने बुधवारी सायंकाळी उशिराने दाखल केलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपी वकिल नाना चव्हाण व त्याची पत्नी पारसाबाई, मुले दादा व तान्हाजी यांच्यासह राहुल दादा चव्हाण, भिकाजी सखाराम शिंदे, कल्पना भिकाजी शिंदे, कोमल रोहीत शिंदे, मनिषा विनोद चव्हाण व अजय भिकाजी शिंदे अशा दहाजणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून यातील दादा चव्हाण या एकमेव आरोपीला अटक झाली आहे, उर्वरीत सर्वजण पसार झाले आहेत. या धक्कादायक घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून केवळ संशयाच्या कारणावरुन गुन्हेगारांच्या कुटुंबियांनी एका सामान्य वाहनचालकाचा बळी घेतल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.

संगमनेर शहरातील कासारवाडी रस्त्यावर घडलेल्या या धक्कादायक घटनेला चोर्‍या, घरफोड्या या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात कैद असलेल्या रोहीत भिका चव्हाण व अक्षय दादा चव्हाण या दोघांची पार्श्‍वभूमी आहे. पोलीस नोंदीनुसार सदरील दोन्ही आरोपी सराईत आहेत. त्यामुळे कोणत्या न् कोणत्या प्रकरणात त्यांची गजाआड असण्याची शक्यता कायमच जिवंत असते. त्यातूनच त्या दोघांनाही अटक झाली असून दीर्घकाळापासून कारागृहात खितपत आहेत. त्यांच्या गजाआड असण्याला शेजारी राहणारा वाहनचालकच कारणीभूत असल्याचा संशय गुन्हेगारांच्या कुटुंबियांना असल्याने त्यांच्याकडून सोपान चव्हाण यांना लक्ष्य केले जात होते. संशयाचे हे बालंट आपल्या कुटुंबावरही कोसळू नये यासाठी एका सामान्य माणसाने जीवनयात्रा थांबवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. खरेतर हा प्रकार अतिशय धक्कादायक असून गुन्हेगारांचे नातेवाईक उजळमाथ्याने त्यांच्या गुन्ह्यांचे समर्थन करीत असल्याचे पाहून चिंताही निर्माण करणारा आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून त्याचा प्राधान्याने तपास पूर्ण करण्याची गरज आहे.  

Visits: 19 Today: 19 Total: 2209810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *