उसाचा ट्रक रस्त्यावरुन हटवण्याच्या वादातून मारहाण! आरोपीला तीन महिन्यांचा कारावास; तालुक्यातील साकूरमध्ये घडला होता प्रकार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
उसाने भरलेला ट्रक रस्त्यावरुन बाजूला घेण्याच्या वादातून ट्रकचालकाला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला तीन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. साकूर परिसरातील चौगुले वस्ती परिसरात सप्टेंबर 2018 मध्ये घडलेल्या या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदार, वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले. त्यावरुन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरळकर यांनी हा निकाल दिला.


याबाबतची हकिकत अशी की, 30 सप्टेंबर 2018 रोजी रात्री नऊच्या सुमारास सदरची घटना घडली होती. फिर्यादी ट्रकचालक गंगाधर भागा वाळुंज (रा.गुंजाळवाडी पठार) हे उसाने भरलेला ट्रक (एम.एच 19/ए.जी 2016) घेऊन कौठे मलकापूर येथील युटेक साखर कारखान्याकडे जात होते. साकूर येथील चौगुले वस्ती परिसरातून त्यांचा ट्रक जात असताना समोरुन आलेल्या शफीक चौगुले या पिकअप चालकाने आपले वाहन ट्रकसमोर आडवे लावल्याचा आरोप होता.


यानंतर आरोपीने फिर्यादीला ट्रकमधून खाली उतरवून गाडी रस्त्याच्या खाली घेण्यास सांगितले. मात्र, ट्रक उसाने भरलेला असल्याने तो रस्त्याच्या खाली घेतल्यास पलटी होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीने सांगितले. त्यावरुन आरोपी संतप्त झाला आणि त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. यावेळी आरोपीने फिर्यादीला नदीत फेकण्याची धमकी देत रस्त्यावरुन वाहन बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरुन मारहाणही केली. आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर, कानावर आणि तोंडवळ्यावर दुखापत केल्याचाही आरोप होता. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीला पिकअप वाहनात बसवून नदीमध्ये फेकून देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.


या घटनेनंतर फिर्यादीने घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 323 आणि 506 अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरळकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात सादर करण्यात आलेले वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. त्यावरुन आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम 323 नुसार तीन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड, तसेच कलम 506 नुसार एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.


या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून मच्छिंद्र गवते यांनी कामकाज पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रवीण डावरे यांनी सहकार्य केले. वाहन बाजूला घेण्यासारख्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून ट्रकचालकाला मारहाण करुन धमकी देण्याच्या या प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्त्वाचा आहे. रस्त्यावरील वादाचे रुपांतर हिंसाचारात करणार्‍यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 2204812

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *