धांदरफळच्या बाजारतळावर दोन गटात प्रचंड धुमश्चक्री! सत्ताधारी व विरोधकांच्या परस्परविरोधी तक्रारी; महिला सरपंचासह नऊजण जखमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कोणत्यान् कोणत्या कारणाने सतत चर्चेत येणार्या धांदरफळमधून पुन्हा एकदा धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यावेळी दुपारी घडलेल्या किरकोळ गोष्टीची विचारणा करण्यावरुन दोन गटात संघर्ष निर्माण होवून बाजारतळावर उभारलेल्या दांडियाच्या मांडवातच सशस्त्र धुमश्चक्री उडाली. गावातील सत्ताधारी आणि विरोधक अशा या वादात दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर लाकडी दांडके आणि दगडांचा यथेच्छ वापर केला. या गदारोळात धांदरफळच्या सरपंच उज्ज्वला देशमाने यांच्यासह दोन्हीबाजूच्या मिळून नऊजणांना दुखापती झाल्या. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराबाबत दोन्हीबाजूने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून तालुका पोलिसांनी 15 जणांवर भारतीय न्यायसंहितेतील गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेतून धांदरफळ बुद्रूक मधील राजकीय वादाला आता हिंसक वळण मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत धांदरफळच्या सरपंच उज्ज्वला देशमाने यांचे पती नवनाथ यांनी दिलेल्या पहिल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता.16) दुपारी चारच्या सुमारास गावातील प्रशांत बाळासाहेब कोल्हे यांनी त्यांच्या पिकअप वाहनाची धडक देत बाजारतळावर दांडियासाठी उभारलेल्या मांडवाचा लोखंडी पाईप तोडला होता. या प्रकारानंतर त्यांनी फिर्यादीचा भाऊ देवीदास यांना फोन करुन शिवीगाळही केली, याबाबत तक्रारदाराने तालुका पोलिसांना कळवल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी नवनाथ देशमाने, सरपंच उज्ज्वला देशमाने यांच्यासह गावातील अन्य मंडळींसह मांडवाजवळ उभे असताना प्रशांत कोल्हे यांच्यासह प्रवीण कारभारी कोल्हे, ऋषिकेश कैलास कोल्हे, कमलेश दिलीप डेरे, ओंकार अण्णा तोरकडी, प्रवीण बंडू गोर्डे, दिलीप श्रीरंग डेरे यांच्यासह दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व दोघांनाही नाहक शिवीगाळ करु लागले.

त्यावेळी नवनाथ देशमाने यांनी शिवीगाळ का करीत आहात? असा प्रश्न करुन दुपारच्या घटनेबाबत विचारणा करताच त्या सर्वांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, फायटर, दगड-विटांचा वापर करुन दोघांनाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या मदतीला धावलेल्या प्रशांत प्रवीण देशमाने व नवनाथ विठ्ठल नाईकवाडी यांनाही त्या सर्वांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. यावेळी प्रशांत कोल्हे याने फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली तर, दिलीप डेरे यांनी गळ्यातील दीडतोळ्याची सोन्याची चेन ओढून घेतल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी वरील सातजणांसह अज्ञात दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दुसर्या गटाकडूनही प्रवीण कारभारी कोल्हे यांनी आज पहाटे विरोधी तक्रार दिली असून त्यात नवनाथ भास्करराव देशमाने, नवनाथ नाईकवाडी, प्रशांत देशमाने, विशाल काळे, अजिंक्य क्षीरसागर यांच्यासह दोघा अनोळखी व्यक्तिंनी आपण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो असता शिवीगाळ व धक्काबुक्की करीत लोखंडी रॉड, लाकडी दांडके, चाकू, दगड-विटांनी मारहाण केली व गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील घड्याळ काढून घेतल्याचे म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादीसह प्रशांत कोल्हे, ओंकार तोरकडी, ऋषिकेश कोल्हे व कमलेश डेरे असे पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संगमनेर तालुक्यातील राजकीय घडामोडींसह आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या गावांमध्ये गणना असलेल्या धांदरफळमध्ये गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने राजकीय धुसफूस सुरु आहे. त्यातून यापूर्वी एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडले असून पोलिसांच्या दप्तरी अशा अर्धाडझन प्रकरणांची नोंद आहे. त्यात शुक्रवारच्या घटनेचाही समावेश झाला असून या प्रकाराने श्री क्षेत्र रामेश्वराच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने धावणार्या धांदरफळच्या अंतर्गत सामाजिक सौहार्दाला डंख लागला आहे. किरकोळ कारणावरुन गावातील महिला व तरुणींसाठी दांडियासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरु असताना घडलेला हा रक्तरंजीत प्रकार धक्कादायक असून त्यातून गावाचा विकास खुंटण्याची अधिक शक्यता आहे. या घटनेतून दोन्ही बाजूच्या 15 जणांवर दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल दाखल झाल्याने पोलीस दप्तरी नोंद झालेल्यांना आता अटक टाळण्यासाठी झगडावे लागणार आहे.

आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुढारलेले धांदरफळ बुद्रूक गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्येष्ठनेते वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात चर्चेत आले होते. तेव्हापासूनच या गावातील सामाजिक शांततेला नख लागले असून गेल्या दीड-दोन वर्षाच्या काळात अनेक विषयांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तालुका पोलीस ठाण्यात अर्धाडझनाहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. या राजकीय वादाची परिणीती आता मात्र गंभीर वळणावर गेली असून शुक्रवारी घडलेल्या सशस्त्र संघर्षाने दोन्ही बाजूच्या 15 जणांवर अतिशय गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. आता या सर्वांना अटक टाळण्यासाठी भूमीगत होवून न्यायालयीन संघर्ष करावा लागणार आहे. त्यातून धांदरफळमधील सामाजिक सौहार्दाची पूर्णतः वाट लागण्याची शक्यता आहे.

