संगमनेरच्या महाविकास आघाडीत मिठाचा खडा! विरोधकांची राजकीय शक्ति दुभंगली; उद्धव ठाकरे गटाचा वेगळा मार्ग..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे देशभरातील विरोधी पक्ष आणि संघटनांची एकत्रित मोट बांधून काँग्रेसने मतचोरीच्या मुद्द्यावरुन देशभरात रान उठवलेले असताना दुसरीकडे दिग्गजनेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात मात्र विरोधकांच्या एकसंधतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत. त्याचा प्रत्यय मंगळवारी मतचोरीच्या मुद्द्यावरुन संगमनेरात झालेल्या आंदोलनातही दिसून आला. वास्तविक राहुल गांधी यांची प्रतिमा पुन्हा स्थापित करण्यासाठी काँग्रेसकडून देशभर या विषयाचा विस्तू फिरवला जात असताना संगमनेरसह जिल्ह्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची अपेक्षा होती. मात्र जिल्हा बँकेच्या माध्यमातून सध्या समझौता एक्सप्रेस धावत असल्याने त्याच्या धुरळ्यात मतचोरी मागे पडली असून राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा घटक असलेल्या उद्धव ठाकरे गटाने मात्र संगमनेरात काँग्रेसला टाळून या आंदोलनात आघाडी घेतल्याने नव्या राजकीय चर्चेचा बांध फूटला आहे. त्यातूनच संगमनेरच्या आघाडीत आता सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसू लागले असून विरोधकांच्या एकसंधतेतही मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींच्या प्रमुख ठिकाणांमध्ये समावेश असलेला संगमनेर मतदारसंघ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून गणला जायचा. काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून राजकीय हस्तांतरीत झालेल्या या मतदारसंघावर वर्चस्व गाजवतानाच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्ष वाढीसाठी संघटनात्मक पातळीवरही मोठे योगदान दिले. कोणत्याही शक्यता नसतानाही 2019 मध्ये राज्यातील त्रिशंकू राजकीय स्थितीत त्यांनी ज्येष्ठनेते शरद पवार यांच्यासोबत थेट उद्धव ठाकरेंशीच संधान साधून भाजप-शिवसेनेचा 30 वर्षांचा राजकीय संसार मोडीत काढण्यातही मोठी भूमिका बजावली होती. त्यातूनच अशक्यप्राय वाटणार्‍या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा जन्म झाला.


त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीसह विरोधकांच्या प्रमुख चेहर्‍यांमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चेहर्‍याचा समावेश आहे. विधानसभेतील पराभवानंतरही त्यांनी आपली पक्ष व विचार निष्ठा कायम ठेवून वाटचाल कायम ठेवलेली असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीने मात्र त्यांना काहीअंशी बॅकफूटवर आणले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार शक्ति हाती ठेवण्याच्या इराद्याने त्यांनी कट्टर राजकीय विरोधक म्हणून सामान्यांमध्ये आजही समज असलेल्या विखे-पाटील घराण्याशी पुन्हा सुत जुळवताना बँकेच्या निवडणुकीला समझौत्याचे इंजिन जोडले. त्याला एक-एक डबा जोडत गेल्याने जिल्ह्यात राजकारणा पलिकडचा नवा सहकार पॅटर्न उभा राहिल्याने जिल्ह्यातील अन्य विरोधकांच्या पोटात गोळा उमटायला सुरुवात झाली होती.


मंगळवारी (ता.13) संगमनेरात ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनातून त्याचे प्रतिबिंबही उमटल्याचे दिसून आले. गेल्याकाही दिवसांपासून विशेषतः पालिका निवडणुकानंतर स्थानिक काँग्रेसप्रणित सत्ताधार्‍यांसह माजीमंत्र्यांकडूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्‍वासात घेणं टाळलं गेलं. त्यामागे काही राजकीय हेतू होता किंवा अन्य कारणं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र याच कारणाने गेल्याकाही दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेला स्थानिक ठाकरेगट अस्वस्थ होता. या गटाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी यापूर्वी सोशल माध्यमात वेगवेगळ्या प्रसंगाचे व्हिडिओ शेअर करुन आपल्या नाराजीला वाचाही फोडली होती. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली गेल्याचे ऐकिवात नाही. त्यातच लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्याच सोबत समझौता करताना साधी विचारणाही केली नाही, त्यामुळे आघाडीतील या मोठ्या घटकपक्षाची स्थानिक घुसमट वाढली होती.


मंगळवारी त्याचे सार्वजनिक स्वरुप ठळकपणे समोर आले. खरेतर सध्या सुरु असलेल्या मतदारयाद्यांच्या पुनःरीक्षणाच्या प्रक्रियेवर बोटं ठेवून त्यातून मतचोरी होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने देशात अक्षरशः रान माजवले आहे. या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून एकामागोमाग पराभव सोसणार्‍या आणि पराभूत नेतृत्व अशी ओळख निर्माण झालेल्या राहुल गांधी यांची प्रतिमा पुन्हा स्थापित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनाची धग पोहोचवून घराघरात मतचोरीचा नरेटीव्ह पोहोचवला जात आहे. या मोहिमेत काँग्रेसने आघाडी घेतल्याने संगमनेरसह जिल्ह्यात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे राहण्याची अपेक्षा होती, मात्र जिल्हा बँकेच्या समझौता एक्सप्रेसच्या धुरळ्यात ती अदृष्य झालेली असताना मंगळवारी याच विषयावर उद्धव ठाकरे गटाने मात्र जोरदार घोषणाबाजी आणि ज्ञानेशकुमारांच्या प्रतिमेला खेटरांचा नेवैद्य दाखवून काँग्रेसच्या आधीच या मुद्द्यावर आपली पकड निर्माण केली आहे. त्यावरुन संगमनेरच्या महाविकास आघाडीत सर्वकाळी आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसू लागले असून स्थानिक आघाडीच्या एकसंधतेत मिठाचा खडा पडलाय हे हमखास.


राज्यात महाविकास आघाडीची माळ गुंफली गेल्यापासूनच संगमनेरच्या ठाकरेगटाने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतीने महायुतीच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतली आहे. मात्र गेल्याकाही महिन्यांपासून ठाकरेगटातील काही पदाधिकार्‍यांकडून सोशल माध्यमातील विविध वक्तव्य आणि व्हिडिओद्वारा दिले जात असलेले संदेश स्थानिक आघाडीतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आणणारे ठरले आहेत. मंगळवारी काँग्रेसच्याच मूळ आंदोलनाला हायजॅक करीत ठाकरेगटाने त्यांना टाळून केलेल्या आंदोलनातून ही गोष्ट अधोरेखीत केली आहे.

Visits: 9 Today: 9 Total: 2204815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *