चोरट्यांनी मारला जिल्हा पोलिस दलाच्या बिनतारी यंत्रणेवरच डल्ला..! संगमनेर तालुक्यातील बाळेश्वरच्या डोंगरावरुन पोलिसांची बिनतारी यंत्रणाच लांबविली; राज्याच्या पोलिस दलात खळबळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. गेल्या चार दिवसांतील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळेबाळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलिस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली. बाळेश्वराच्या उंच टेकडीवर ही यंत्रणा बसवण्यात आली होती. त्या माध्यामातून संगमनेर, घारगाव, संगमनेर तालुका, अकोले व राजुर पोलीस ठाण्यांंसह पुणे जिल्ह्याच्या सीमाभागातील पोलीस ठाण्यांंशी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा विनाअडथळा संवाद होत होता. या चोरीच्या घटनेमुळे मात्र ही यंत्रणा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीच ते सकाळी सात वाजेच्या सुमारास सदरची घटना संगमनेर तालुक्यातील सुविख्यात धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या बाळेश्वर मंदिरात घडली. याठिकाणी जिल्हा पोलीस विभागाने उंचावर असलेल्या घारगाव, अकोले, राजुर व पुणे जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांशी विनाअडथळा संवाद सुरु राहावा यासाठी बिनतारी यंत्रणा बसविलेली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी रक्षकही तैनात केलेला असतो. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. असे असतानाही चौघा चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास या सर्व कॅमेर्‍यांची मोडतोड करून, बिनतारी यंत्रणेच्या कंट्रोल कक्षात प्रवेश केला व त्या ठिकाणी असलेल्या बिनतारी यंत्रणेचे दोन रिपीटर, तीन चार्जर, इंटरनेट राउटर, मायक्रोवेव्ह लिंक व अन्य साहित्य असे एकूण तीन लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पोबारा केला.
आज सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर गडबडलेल्या घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आल्यानंतर नाशिक बिनतारी संदेश विभागाचे उपअधीक्षक गजानन शेलार, संगमनेर उप विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्यासह घारगावचे प्रभारी निरीक्षक पांडुरंग पवार,  अहमदनगरच्या बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी.ताम्हाणे, घारगावचे उपनिरीक्षक डी.पी.राऊत आदींनी घटनेची माहिती घेतली. तपासासाठी नगरहून श्वानपथक तर नाशिकहुन ठस तज्ज्ञांचेे पथकही आले होते. या घटनेने  केवळ अहमदनगरच नव्हेतर संपूर्ण राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवारी पुणे येथील वनविभागाने पठारावरील खंदरमाळ नजीक कारवाई करीत वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तिघांना मुद्देमालासह पकडले होते. तर राजगुरूनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात साकुर परिसरातील पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोळा मोटार सायकल हस्तगत झाल्या. यातील पाच आरोपी पठारावरील आहेत. तर वन्यजीव तस्करी प्रकरणातील दोन आरोपी साकुर परिसरातीलच आहेत. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी चोरट्यांनी चक्क पोलिसांच्या यंत्रणेवरच हात मारल्याने या घटनेचा लवकरात लवकर तपास करण्याचे आव्हानच जिल्हा पोलिस दलासमोर उभे राहिले आहे.
Visits: 19 Today: 1 Total: 115753

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *