दिल्लीतील शेतकर्‍यांना मुंबईतून ताकद; आझाद मैदानात ‘एल्गार’! शरद पवार होणार सहभागी?, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोर्चाला पाठिंबा

मुंबई, वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांनी ठाण मांडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. आज (सोमवार ता.25) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला असून ते देखील मोर्चात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली असल्याचे समजते. त्याचबरोबर, अद्यापही मुंबईत करोनाचं संकट आहे असे असताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असेही पवारांचे मत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री मोर्चात सहभागी होणार असल्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आझाद मैदानातील मोर्चात सहभागी होणार आहे. तसेच काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सांगलीमधील विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात करण्यात आली. सांगली ते कोल्हापूर असा मोर्चाचा मार्ग आहे. या मोर्चासाठी शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येने हजर झाले होते. तसेच, सहभागी शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा देखील ट्रॅक्टरवर लावलेला होता. केंद्र शासनाने तिन्ही शेतकरी कायदे परत घ्यावेत, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.

शेतकर्‍यांच्या मागण्या काय?
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारने स्थगित केलेली महात्मा फुले कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकर्‍यांच्या आहेत.

विरोधी पक्षाची म्हणावी तशी साथ मिळत नाही…
शेतकरी विरोधी कायद्याविरोधात देशव्यापी शेतकरी आंदोलन सुरू असताना, विरोधी पक्षाची म्हणावी तशी साथ मिळत नाही. बड्या भांडवलदारांच्या भीतीने अंकित झालेले विरोधक या आंदोलनाला साथ देत नाहीत. अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली.

Visits: 153 Today: 1 Total: 1113925

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *