प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला संगमनेरात लागले गालबोट! सत्तर वर्षीय वृद्धाने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा होत असताना संगमनेरात मात्र या उत्साहाला गालबोट लागले आहे. न्यायालयीन प्रक्रीयेत असलेला व्यवहाराचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करुन सोडवावा यासाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आज सकाळी पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी काही पोलीस कर्मचार्‍यांसह प्रसंगावधान राखून त्यांच्यावर वेळीच पाणी टाकले, मात्र त्यात तेे साठ टक्क्याहून अधिक भाजले असल्याचे वृत्त आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी आपण आत्मदहन करणार असल्याचा अर्ज त्याने तब्बल तीन दिवसांपूर्वीच शहर पोलिसांना दिला होता, मात्र त्याला त्या पासून परावृत्त करण्यात अथवा त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना अपयश आले. गेल्या वषीही त्यांनी असाच प्रयत्न केला होता.


याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार खांडगाव शिवारातील गणेशवाडी येथे राहणार्‍या अनिल शिवाजी कदम (वय 70) यांनी काही वर्षांपूर्वी गणेशवाडीतील सादीक रज्जाक शेख व सुमय्या सादीक यांच्याशी एका जागेचा व्यवहार केला होता. त्यापोटी दोघांमध्ये साठेखतही (विसार पावती) झाले होते. मात्र व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्या दोघांमध्ये वाद होते. हा वाद अखेर न्यायालयात दाखल झाला आणि सध्या न्यायप्रविष्ठ आहे. असे असतांनाही या वादात हस्तक्षेप करुन पोलिसांनी आपल्या घरातील शेख कुटुंबियांना बाहेर काढावे अशी कदम यांची मागणी होती.


मात्र, सदर प्रकरण न्यायालयीन प्रक्रीयेत असल्याने पोलिसांना त्याबाबत कोणतीही कारवाई करणं अशक्य होते. मात्र सदरच्या ज्येष्ठ नागरिकाला वारंवार समजावून सांगूनही ते आपल्या मागणीवर कायम होते. त्यातूनच त्यांनी तीन दिवसांपूर्वी 24 जानेवारी रोजी पोलिसांना निवेदन देवून आपल्या घरात अनाधिकाराने वास्तव्य करणार्‍या कुटुंबाला बाहेर न काढल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांना अर्ज प्राप्त झाल्याच्या क्षणापासून त्यांनी कदम यांचा कसून शोध घेतला, मात्र गेल्या वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने अर्ज देताच कदम भूमिगत झाले होते.


आज सकाळी शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात परतत असतांनाच आधीच तहसील कार्यालयाच्या आवारात हजर झालेल्या अनिल कदम यांनी कोणाला काही कळायच्या आतच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. सदरचा प्रकार लक्षात येताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी त्यांच्याकडे धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाणी टाकून त्यांना विझवले व तत्काळ शहर पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनातून त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यात ते सुमारे साठ टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नगरच्या सामान्य शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


सदर इसमाच्या मागणीचे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनीही त्यांनी असाच प्रकार करण्याचे नियोजन केले होते, मात्र पोलिसांनी त्यांना तत्पूर्वीच अटक केल्याने त्यावेळी अनर्थ टळला. गेल्या वर्षीचा अनुभव घेवून यावर्षी मात्र अनिल कदम यांनी अर्ज देताच स्वतःला भूमिगत केले. पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेवूनही ते आढळून आले नाहीत. आज सकाळी असे काही घडेल याची पुसटशीही कल्पना नसतांना अचानक त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेत अनिल कदम यांच्या मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग व दोन्ही हातांना गंभीर इजा झाली असून त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 117572

One thought on “प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला संगमनेरात लागले गालबोट! सत्तर वर्षीय वृद्धाने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले..

  • January 26, 2021 at 10:05 am
    Permalink

    Nice program sir

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *