घारगावमध्ये टायर फुटल्याने कारने खाल्ल्या तीन पलट्या! ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ सुरू असतानाच अपघातांची श्रृंखला कायम

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरुन धावणार्‍या कारचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने कारने थेट तीन पलट्या खाल्ल्या. यामध्ये केवळ दैव बलवत्तर असल्याने पती, पत्नी व तीन वर्षांचा चिमुरडा बालंबाल बचावले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघात सोमवारी (ता.25) सकाळी साडेसात वाजता घडला आहे. एकीकडे वाहतूक पोलिसांकडून ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ सुरू असताना अपघातांची श्रृंखला कायम राहिल्याने वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तरच सुरक्षा सप्ताहचा उद्देश सफल होणार आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राहुल दौलतराव बडवर हे पत्नी प्रियंका व मुलगा अन्वेश हे सध्या नोकरीनिमित्त मोशी (जि.पुणे) येथे वास्तव्यास आहे. ते आपल्या मूळगावी वाकद (ता.निफाड, जि.नाशिक) येथे आलेले होते. सोमवारी सकाळी पुन्हा ते मोशीला जात असताना पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारात आले असता अचानक कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने कारने थेट तीन पलट्या खाल्ल्या. त्यानंतर महामार्गाच्या कडेला कार चारीही चाके वर झालेल्या अवस्थेत स्थिरावली.

या अपघातात चालक राहुल बडवर यांच्या हाताला जखम झाली असून पत्नी व तीन वर्षांचा मुलगा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवितनाही झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार ज्याठिकाणी पलटी झाली तेथून काही अंतरावरच खोल दरी होती. जर त्या दरीत कार गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. केवळ दैव बलवत्तर असल्याने बडवर कुटुंब हे अपघातातून बालंबाल बचावले आहेत. सदर घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर गावानजीक असणारे गतिरोधक लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहे. यामध्ये अनेकांना गंभीर इजा होते तर अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यासाठी शासनाकडून वारंवार वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. विशेषतः आजही रस्ता सुरक्षा सप्ताह चालू असतानाही महामार्गावरील अपघातांची श्रृंखला चालूच आहे. यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन सुरक्षितरित्या वाहन चालविणे गरजेचे आहे.

Visits: 81 Today: 1 Total: 435695

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *