गुन्हे शाखेने फोडली अकरा वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा! बीड जिल्ह्यातून आरोपी जेरबंद; साडेपाच लाखांचा मुद्देमालही चोरल्याचे उघड..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
आपल्या जोडीदारासह रायपूर (छत्तीसगड) येथे बायडींग वायर भरण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या इसमाचा आणि त्यासोबतच चोरीला गेलेल्या साडेपाच लाखांच्या बायडींग वायर प्रकरणाचा उलगडा करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला तब्बल 11 वर्षांनंतर यश आले आहे. या प्रकरणी नाव व गाव बदलून राहणार्‍या सदर मालट्रकच्या चालकाला बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात घातापाताच्या हेतुसाठी अपहरण आणि जबरी चोरीचा तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल आहे.


याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 2011 साली घडलेला आहे. पुण्यातील विमाननगर येथे राहणारा अनिल सखाराम सोनवणे (वय 29) हा आपल्या मालट्रकचा चालक भरत मारुती सानप (रा.खडकवाडी, ता.पाटोदा, जि.बीड) याच्यासोबत 11 मार्च 2011 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे बायडींग वायर भरण्यासाठी गेला होता. 16 मार्च रोजी त्यांनी आपल्या मालट्रकमध्ये 5 लाख 48 हजार 940 रुपयांची बायडींग वायर भरुन ते पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले. 18 मार्चरोजी त्यांचे वाहन ते जालना येथे पोहोचल्याचे सोनवणे याने आपल्या घरी फोन करुन कळविले होते, मात्र हा फोन त्याचा शेवटचा संवाद ठरला.


यानंतर तीन दिवसांनी 21 मार्च 2011 रोजी सदरचा मालट्रक (क्र.एम.एच.12/ए.व्ही.6449) पाथर्डी (जि.अ.नगर) तालुक्यातील भगवानगड परिसरात बेवारस स्थितीत आढळून आला. मालट्रकमध्ये भरलेली बायडींग वायर व वाहनातील दोघेही गायब होते व त्यांचे मोबाईलही बंद स्थितीत होते. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहन चालकाच्या केबीनमध्ये रक्ताचे डागही आढळून आले होते. त्यावरुन अनिल सोनवणे यांचा भाऊ नितीन याने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मालट्रकचा चालक भरत मारुती सानप याच्यावर भा.द.वी.कलम 364 (घातपाताच्या हेतूने अपहरण) सह 394 (जबरी चोरी) नुसार गुन्हाही दाखल केला होता. सदरची घटना अकरा वर्षांपूर्वीची असल्याने एकप्रकारे ती इतिहास जमा झाल्याचे समजून आरोपी आपले नाव व गाव बदलून आरामात दिवस काढीत होता.


मात्र नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाबाबत आणि वर्षोनुवर्षे पसार असलेल्या आरोपींबाबत कठोर भूमिका घेतल्याने त्यांच्या सूचनेवरुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना सदर प्रकरणातील सत्यता समोर आणून आरोपींना गजाआड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो.हे.कॉ.बापूसाहेब फोलाणे, पो.ना.भिमराज खर्से, सुरेश माळी.रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व चालक बबन बेरड यांचे पथक तयार करुन त्यांना आवश्यक त्या सूचना देत रवाना केले.


या दरम्यान पो.नि.कटके यांना खबर्‍यामार्फत आरोपीचा ठावठिकाणा समजला असता त्यांनी पथकाला तेथे छापा घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेल्या कन्हेरवाडीत छापा घातला. मात्र सदर संशयीताने आपले नाव भरत नव्हेतर अभिमान मारुती सानप असे असल्याचे सांगत चक्क त्याच नावाचे आधारकार्डही तपास पथकाला दाखविले. मात्र मिळालेली खबर पक्की असल्याची खात्री असल्याने पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना 2006 सालचे भरत मारुती सानप नावाचे मतदान कार्ड सापडले, त्यावरुन सदरची व्यक्ति अभिमान नाही तर भरत मारुती सानप असल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने त्याला जागीच जेरबंद केले.


यावेळी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खुनाची कबुली देत घडला घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली. अनिल सोनवणे हा नेहमी भरत सानप याच्या बायकोविषयी वाईट बोलायचा, त्याचा राग सानप याच्या डोक्यात होता. रायपूर (छत्तीसगड) येथून बायडींग वायर भरुन ते दोघेही आपल्या मालट्रकमधून पुण्याकडे येत असतांना देवरीगाव (जि.गोंदीया) येथे ट्रकची हवा तपासण्यासाठी ते थांबले. यावेळी दोघांत शाब्दीक वादही झाले होते, त्याचा राग मनात धरुन भरत सानप याने आपल्या हातातील लोखंडी पाना त्याच्या डोक्यात मारला असता तो बेशुद्ध पडला. त्यामुळे घाबरलेल्या सानप याने त्याला उचलून चालकाच्या केबनमध्ये ठेवले व तो जालन्याच्या दिशेने निघाला.


त्यांचा मालट्रक सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) येथे पोहोचला असता पाठीमागील सीटावर झोपलेल्या अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाल्याचे भरत सानपच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने आपले वाहन बुलढाणा-जालना रस्त्यावरील एका खंदकाजवळील नाल्याच्या पुलावर उभे करीत अनिल सोनवणे याचा मृतदेह बाहेर काढून वाहनातील अंथरुण व पांघरुण तसेच आसपासचे वाळलेले गवत गोळा करुन तो पेटवून दिला व तो वाहन घेवून तेथून निघून गेला. त्यानंतर त्याने आपल्या परिचयातील सुनील आश्रृबा सानप व परमेश्‍वर उत्तम दराडे या दोघांच्या मदतीने ट्रकमधील 5 लाख 48 हजार 940 रुपयांच्या बायडींग वायरचीही विल्हेवाट लावल्याची माहिती आरोपीने गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.


आरोपीने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक थेट सिंदखेडराजा येथे पोहोचले. तेथील पोलीस दप्तरी अभिलेखागारात 2011 सालच्या गुन्ह्याची माहिती तपासली असता 19 मार्च 2011 रोजी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अज्ञात इसमाविरोधात खुनाच्या कलमासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. सदर प्रकरणात मयत आणि आरोपी दोघांचाही तपारस लागलेला नसल्याने सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्ह्याची ‘अ’ समरी करुन तो कायमस्वरुपी तपासावर ठेवला होता. आरोपीने दिलेली माहिती आणि सिंदखेडराजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीत साम्य असल्याने गुन्हे शाखेने पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याला अटक करुन त्याला त्यांच्या स्वाधीन केले. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्यानंतर त्याला सिंदखेडराजा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. तब्बल अकरा वर्षांपूर्वी घडलेल्या आणि एकप्रकारे इतिहास झाल्याचे समजून बिनधास्त नाव व गाव बदलून राहणार्‍या आरोपीच्या अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळीत कायद्याचे हात किती लांब असतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Visits: 190 Today: 3 Total: 1110909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *