देवगडला ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रांगणात पालखी मिरवणूक
नायक वृत्तसेवा, नेवासा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंतीनिमित्त मंगळवारी (ता.29) सकाळी 8 वाजता ‘दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ… दिगंबरा…’चा जयघोष करत मंदिर प्रांगणात भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
दत्तजयंती निमित्ताने श्री क्षेत्र देवगड येथे पहाटेच्या सुमारास श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख भास्करगिरी महाराजांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात येऊन त्याचेही विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर प्रांगणात प्रदक्षिणास प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ‘दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ… दिगंबरा…’ असा जयघोष करत मोजकेच झेंडेकरी सजविण्यात आलेली पालखी तर त्यामागे डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या महिला भाविक असे प्रदक्षिणा दिंडी मिरवणुकीचे स्वरूप होते.
श्री दत्तजयंती निमित्ताने यावर्षी कोरोना महामारीमुळे शासन नियमांचे पालन म्हणून भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दत्त जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच यात्रा रद्दचा निर्णय याआधीच झाल्याने आज पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. प्रवरासंगम, देवगडफाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणार्या रस्त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारच्या सत्रात दत्तजयंती निमित्ताने सात दिवस चाललेल्या दत्तयागाची भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून होम कुंडात श्रीफळ अर्पण करत पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता मंदिरासमोरील कीर्तन मंडपात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीतील दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रयांच्या जन्म सोहळ्याचे प्रक्षेपण विविध वाहिन्यांवर करण्यात आले.