‘तीनबत्ती’ चौकात पुन्हा गस्तीवरील पोलिसांना दमबाजी! ‘हमारें मोहल्ले में आने का नहीं’ असे दरडावून तिघांनी भरला पोलिसांनाच दम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याभरापूर्वी तीनबत्ती चौकात बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांना अजूनही निम्म्याहून अधिक आरोपींचा माग लागत नसतांना आता त्याच तीनबत्ती चौकातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी या परिसरात गस्तीवर असलेल्या अहमदनगरच्या तिघा पोलीस कर्मचार्यांना तिघा तरुणांनी ‘मागच्या वेळी तुमच्या लोकांना पळवून पळवून मारले, तरीही तुम्ही इकडे कशाला आलात? आमच्या भागात फिरकायचे नाही’ असा सज्जड दमच भरला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला आहे. या घटनेतून महिन्याभरापूर्वीच्या ‘हल्ल्याच्या’ आठवणी पुन्हा जागल्या असून पोलिसांचा ‘चालढकलपणा’च या गोष्टीला कारणीभूत ठरल्याचे अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी (ता.1) पोलीस मुख्यालयातील पो.कॉ.रामेश्वर पंडित आपले सहकारी पो.कॉ.भोजे व पो.कॉ.भालेराव यांच्यासह तीनबत्ती चौकात गस्तीवर होते. यावेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील तिघेजण रस्त्याने जाताजाता त्यांच्याजवळ आले आणि त्यांना दमबाजी करु लागले. यावेळी त्या तिघांनी गस्तीवरील पोलिसांना ‘तुम्हाला समजत नाही का? मागील वेळी तुमच्या माणसांना आम्ही पळवून पळवून मारले होते, आमच्या गल्लीत परत यायचे नाही, नाहीतर परिस्थिती खराब करुन टाकू’ असा सज्जड दमच भरला. या प्रकारानंतर संबंधित कर्मचार्यांनी घडली घटना शहर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या कानावर घातली.

त्यानंतर त्यांच्या आदेशाने रात्री उशीराने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचार्याचा 186 अंतर्गत जवाब नोंदवून घेतला आहे. या वृत्ताने पोलीस वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रत्यक्षात कारवाई करुन दम देणार्या त्या तिघांच्या मुसक्या आवळतात की ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या..’ चाच कित्ता गिरवतात याकडे आता पोलीस दलासह संपूर्ण शहराचे लक्ष्य केंद्रीत झाले आहे. पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडून अजून महिनाही उलटला नसतांना त्याच ठिकाणी पुन्हा तसाच प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.

मागील महिन्यात 6 मे रोजी मोगलपुरा परिसरात जमलेल्या मोठ्या गर्दीला पांगवतांना गर्दीतील काही जणांनी पोलिसांवरच हल्ला चढवला होता. यावेळी जमावाने दगडफेक करीत काही खासगी वाहनांचे नुकसान केले. तर तिघा पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की करीत मोगलपुरा ते तीनबत्ती चौकापर्यंत जवळपास तीनशे मीटरपर्यंत आणले व नंतर चौकातच मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी जमावातील लोकांची संख्या मोठी असल्याने पोलीस जवानांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या संपूर्ण घटनेचे कोणीतरी अज्ञात इसमांनी व्हिडिओ चित्रण करुन ते सामाजिक माध्यमातून व्हायरल केल्याने सदरचे प्रकरण राज्यभर पसरले. त्यामुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला.

मात्र तरीही महिन्याभराचा कालावधी उलटूनही पोलिसांना तीनबत्ती प्रकरणात जमावाला चिथावणी देणार्यांसह बहुतेक आरोपींचा मागच काढता आला नाही. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या आरोपींकडून आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल होवू लागले असून पोलिसांकडूनही त्याला सक्षमपणे विरोध होत नसल्याने त्यांचे अर्ज मंजूरही होत आहेत. त्यामुळे एकीकडे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण सुरु आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनसुबे अधिक प्रबळ होत असून त्यातून ‘तीनबत्ती पार्ट 2’ ची कथा रंगविण्याचे काम सुरु झाल्याचे मंगळवारच्या घटनेतून अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ वास्तव समोर आले आहे. तरीही पोलिसांच्या मुखी मात्र संगमनेरात ‘रामराज्य’ नांदत आहे.

वास्तवतः गेल्या महिन्यात घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न जोपासता तो हल्ला म्हणजे संपूर्ण पोलीस दलावरील हल्ला समजून धडक कृती करण्याची गरज होती. मात्र या घटनेनंतर शहरापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरील अप्पर पोलीस अधीक्षकांना संगमनेरात यायला दुसरा दिवस उजेडला, तर जिल्हा पोलीस प्रमुखांना हा प्रकारच फारसा गंभीर न वाटल्याने त्यांनी संगमनेरात येण्याचेच टाळले. त्यातून मनोधैर्य उंचावलेल्यांकडून असा प्रकार पुन्हा करण्यासाठी आता सज्जता सुरु झाली असून त्याची पहिली झलक गेल्या मंगळवारी (ता.1) त्याच तीनबत्ती चौकात पोलिसांनाच अनुभवायला मिळाली आहे.

