स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगावमध्ये गुटखा पकडला तिघे ताब्यात तर 5 लाख 92 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहराजवळील टाकळी नाका येथे गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून 5 लाख 92 हजार 678 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, कोपरगाव येवला रस्त्यावरील टाकळी नाक्याजवळ गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू मारुती कंपनीच्या वॅगनर व ओम्नी गाडीमध्ये घेऊन येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे मनोहर शेजवळ, पोहेकॉ. संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना. शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, पोकॉ. सागर ससाणे, रोहित जाधव, गावडे व भरत बुधवंत यांना कारवाईचे आदेश दिले.

या पथकाने वरील वर्णनाप्रमाणे वाहनांवर छापा टाकून विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू आढळून आल्याने वसीम चाँदभाई चौपदार (रा. गांधीनगर, कोपरगाव), राजमल मिश्रीलाल बोथरा (रा. निवारा, कोपरगाव), अर्जुन लक्ष्मण शेळके (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील 2 लाख 82 हजार 678 रुपये किंमतीचा विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू तसेच मारुती कंपनीची 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची बॅगनर व 1 लाख 60 हजार रुपये किंमतीची ओम्नी असा एकूण 5 लाख 92 हजार 678 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.
