निमजला बिबट्याची तीन बछडे आढळली; परिसरात भीतीचे वातावरण वन विभागाकडून बछडे मादीच्या सहवासात; शेतकरी घराबाहेर पडण्यासही धजेना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या प्रवरा पट्ट्यातील निमज येथे सोमवारी (ता.28) सकाळी एका शेताच्या कडेला बिबट्याची तीन बछडे आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, वन विभागाचे वनरक्षक सी.डी.कासार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही बछड्यांना शेजारीच असलेल्या उसाच्या शेतातील मादीच्या सहवासात अलगद सोडून दिले. यावेळी वन विभागासह नागरिकांनी निःश्वास सोडला. परंतु, बछडे असल्याने मादी आक्रमक पवित्रा धारण करत असल्याने दहशतीखालील शेतकरी घराबाहेर पडण्यासही धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, निमज येथील एका शेताच्या कडेला बिबट्याची तीन बछडे असल्याची माहिती स्थानिकांनी मोबाईलवरून वन विभागाचे वनरक्षक सी.डी.कासार यांना दिली. त्यावर माहिती समजताच कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही बछड्यांना एका टोमॅटोच्या जाळीमध्ये ठेवून ती शेजारील उसाच्या शेतात असलेल्या मादीच्या सहवासात अलगद सोडून दिले.

या घटनेबाबत कासार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मादीपासून बछड्यांना दूर ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे तिन्ही बछडे मादीच्या सहवासात सोडून देण्यात आलेली आहेत. दरम्यान, सुजलाम-सुफलाम प्रवरा पट्ट्यातील धांदरफळ, निमज हा संपूर्ण बागायती प्रदेश आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने वन्यजीवांना हक्काचे आश्रयस्थान बनत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे दर्शन होत असल्याचे स्थानिक सांगतात. परंतु, वारंवार बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. वन विभागाने तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा शेतातील पिकांना रात्रीच्या वेळी पाणी भरणेही मुश्किल होईल.

