‘छोटू महाराज सिनेमा’ थिएटरचा दिमाखात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खरेतर ‘एस.एम.एस.’ या शब्दाचा अर्थ सुंदर सुविधेची सुरुवात करणारा असा होत असून, एसएमएस म्हणजेच संजय, महेंद्र, आणि शेखर या त्रिकुटाने संगमनेरकरांच्या अद्ययावत मनोरंजनाच्या मेजवानीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊन सत्यात उतरवले आहे. संगमनेरकरांना आता मनोरंजनासाठी नाशिक, पुणे व मुंबईबाहेर कुठेही जाण्याची गरज नसल्याने शहरातच हाकेच्या अंतरावर असलेल्या घुलेवाडी परिसरात ही संकल्पना सत्यात उतरवली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते नुकतेच छोटू महाराज सिनेमा रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, नवनाथ अरगडे, सीताराम राऊत, निर्मला गुंजाळ, नाना भोत, श्रीनिवास भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले, संगमनेरमध्ये एसएमएस ग्रुपने वातानुकूलित असा छोटू महाराज सिनेमा हॉल सुरू केला. त्यामुळे संगमनेरकरांना मनोरंजनासाठी नाशिक-पुणेला जाण्याची गरज नाही. उद्योजक मनीष मालपाणी म्हणाले, संगमनेरकर मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी नाशिक, पुणे व लोणी येथे फॅमिलीसोबत जातात. पूर्वी राजस्थान, माधव, यशोदीप थिएटर सुरू होते. खर्या अर्थाने नववर्षाच्या निमित्ताने संगमनेरवासियांसाठी तीन मित्रांनी ‘एसएमएस ग्रुप’ने दिलेली भेट आहे. स्वागत संजय भोत, महेंद्र चांडक व शेखर गाडे यांनी केले. मनोरंजनाचे व्यासंगी व दर्दी संगमनेरकराच्या पसंतीला ही संकल्पना नक्कीच उतरेल असा विश्वासही त्रिकुटांनी व्यक्त केला आहे.

